Virat Kohli New Record: इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 19 व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामन्यात विराट कोहलीने पुन्हा एकदा आपल्या बॅटने क्रिकेट विश्वावर शिक्कामोर्तब केले आहे. या सामन्यात अवघी 16 वी धाव पूर्ण करताच विराटने या हंगामातील आपल्या 500 धावांचा टप्पा ओलांडला. या कामगिरीसह त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि फॅफ डु प्लेसिस या दिग्गजांना मागे टाकून एक अनन्यसाधारण विक्रम आपल्या नावे केला आहे.
35 वर्षांनंतरही 'विराट' फॉर्म; सचिन आणि डु प्लेसिसला टाकले मागे
वयाची पस्तीशी ओलांडल्यानंतर अनेक खेळाडूंचा फॉर्म खालावतो, मात्र कोहलीच्या बाबतीत हे चित्र उलटे दिसते. IPL इतिहासात वयाची 35 वर्षे पूर्ण केल्यानंतर एकाच हंगामात 500 पेक्षा जास्त धावा करण्याची किमया कोहलीने आता तिसऱ्यांदा करून दाखवली आहे. सचिन तेंडुलकर आणि फॅफ डु प्लेसिस यांनी हा टप्पा प्रत्येकी दोनदा गाठला होता. विराटने 2024 मध्ये 741, 2025 मध्ये 657 आणि आता 2026 मध्ये 13 सामन्यांत 54.2 च्या सरासरीने 542 धावा कुटल्या आहेत, ज्यात दोन शतकांचाही समावेश आहे.
ॲलेक्स हेल्सच्या जागतिक विक्रमाशी बरोबरी
पंजाब किंग्सविरुद्धच्या डावात कोहलीने केवळ वैयक्तिक धावाच केल्या नाहीत, तर मोलाच्या भागीदारीही रचल्या. पुरुष T20 क्रिकेटमध्ये 50 पेक्षा अधिक धावांच्या सर्वाधिक भागीदारींचा भाग बनण्याच्या विक्रमात विराटने आता इंग्लंडच्या ॲलेक्स हेल्सशी बरोबरी केली आहे. या दोघांच्याही नावावर आता प्रत्येकी 210 अशा भागीदारींची नोंद झाली आहे. कोहलीने या सामन्यात 58 धावांची झुंजार खेळी केली.
हेही वाचा – KKR vs GT: शुभमन-बटलरची झुंज व्यर्थ! केकेआरच्या वादळी विजयाने गुजरातचं समीकरण बिघडलं
IPL इतिहासात नवव्यांदा 500 धावांचा टप्पा पार
एकाच हंगामात 500 हून अधिक धावा सर्वाधिक वेळा करण्याच्या बाबतीत विराट कोहली आता 'बादशहा' ठरला आहे. त्याने हा टप्पा विक्रमी नऊ वेळा गाठला आहे. या यादीत के.एल. राहुल आणि डेव्हिड वॉर्नर प्रत्येकी सात वेळा ही कामगिरी करून दुसऱ्या क्रमांकावर आहेत, तर शिखर धवनने पाच वेळा हा पल्ला गाठला आहे. विराटचा हा सातत्यपूर्ण फॉर्म पाहता, वयाचा त्याच्या फिटनेस आणि खेळावर कोणताही परिणाम झालेला नाही, हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.