Divorce Celebration Viral Video : उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातून एक अतिशय विचित्र आणि अनोखी घटना समोर आली आहे. पत्नीसोबतचे वाद मिटवण्यासाठी किंवा सुखी संसारासाठी नवस करण्याऐवजी, एका तरुणाने पत्नीपासून सुटका मिळाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी चक्क 9 किलोमीटरची ‘दंडवत यात्रा’ पूर्ण केली आहे. वैवाहिक कलहातून मुक्त झाल्यामुळे देवाला धन्यवाद देण्यासाठी या 25 वर्षीय तरुणाने केलेल्या या अनोख्या कृत्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
वैवाहिक कलह आणि संसाराच्या जाचातून मुक्ती?
उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील नरखोरिया गावातील रहिवासी असलेल्या जोगेश या तरुणाचे लग्न 2022 मध्ये झाले होते. दिल्लीत पीओपी (इंटीरियर डिझाइन) क्षेत्रात काम करणाऱ्या जोगेशने लग्नानंतर पत्नीला दिल्लीला नेले होते. मात्र, कमी उत्पन्न आणि कामाच्या वेळेवरून त्यांच्यात सतत वाद होत असत. या मानसिक तणावातून बाहेर पडण्यासाठी त्याने ‘बैरवा समय माता मंदिर’ येथे नवस केला होता की, जर त्याचा घटस्फोट झाला तर तो 9 किमी दंडवत यात्रा करेल. अखेर 2025 मध्ये त्याचा घटस्फोट झाला आणि आपला नवस पूर्ण करण्यासाठी त्याने ही यात्रा काढली.
प्रशासकीय परवानगी आणि पोलिसांची सुरक्षा
ही यात्रा काढण्यासाठी जोगेशने स्थानिक प्रशासनाकडे रीतसर परवानगी मागितली होती. सध्या जिल्ह्यात BNSS च्या कलम 125 अंतर्गत निर्बंध लागू असल्याने, उपविभागीय दंडाधिकारी हिमांशु कुमार यांनी सुरक्षेची खात्री करून प्रवासाची परवानगी दिली. या 9 किलोमीटरच्या प्रवासात जोगेशच्या सुरक्षेसाठी 2 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. शनिवारी सकाळी उपवास धरून जोगेशने ही यात्रा सुरू केली आणि ‘जय श्री राम’ तसेच ‘जय बजरंगबली’चा जयघोष करत तो मंदिराकडे निघाला.
तलाक की ऐसी खुशी…
यूपी का बस्ती जिला। यहां एक गांव है नरखोरिया। इस गांव में जोगेश रहते हैं। 25 साल उम्र है। 4 साल पहले शादी हुई थी। पिछले दिनों तलाक हो गया। तलाक मिलने पर खुशी जताई। बाकायदा निर्जल व्रत रखा। दंडवत यात्रा की। 9 किलोमीटर चले। 12 घंटा लगा। पूरे रास्ते ‘जय श्री… pic.twitter.com/Yn8bdgADjU — Arvind Chotia (@arvindchotia) March 30, 2026
हेही वाचा – Jalgaon Petrol Video: आता तर हद्द झाली! चक्क पाण्याच्या टाकीत भरलं पेट्रोल-डिझेल, व्हिडीओ व्हायरल
12 तासांचा खडतर प्रवास आणि गावकऱ्यांचा पाठिंबा
जोगेशने अन्नाचा कणही न घेता आणि पाणी न पिता ही कठीण यात्रा सुमारे 12 तासांत पूर्ण केली. सकाळी प्रवासाला सुरुवात केल्यानंतर सायंकाळी तो मंदिरात पोहोचला. या प्रवासात त्याचे कुटुंबीय आणि गावकरीही त्याच्यासोबत होते. वैवाहिक जीवनातील तणाव इतका होता की, त्यातून मिळालेली मुक्ती त्याच्यासाठी कोणत्याही विजयापेक्षा कमी नव्हती. “कठीण काळात घेतलेला संकल्पच या यात्रेची प्रेरणा बनला,” असे जोगेशने प्रवासाअंती प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
सोशल मीडियावरील चर्चा आणि नवीन ट्रेंड
सध्या जगभरात ‘डिव्होर्स पार्टी’ किंवा घटस्फोटाचे सेलिब्रेशन करण्याचा ट्रेंड वाढत असताना, जोगेशने धार्मिक पद्धतीने आपले स्वातंत्र्य साजरे केल्यामुळे नेटकऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. काहींनी त्याच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे, तर काहींनी याला विचित्र म्हटले आहे. मात्र, वैवाहिक आयुष्यातील मानसिक आरोग्याचा प्रश्न किती गंभीर असू शकतो, हे या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. जोगेशच्या या दंडवत यात्रेचा व्हिडिओ आता उत्तर प्रदेशासह देशभर व्हायरल झाला आहे.
हेही वाचा – यांना काय म्हणावं? खरंच या दळभद्री पाकिस्तान्यांनी भीक मागायची नवी पद्धत शोधून काढली