Venezuela Air Strike: अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील दीर्घकालीन तणावाचे रूपांतर आता युद्धाच्या ठिणगीत झाले आहे. अमेरिकन हवाई दलाने व्हेनेझुएलाची राजधानी काराकासवर भीषण हल्ले केल्यानंतर, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अमेरिकन फौजांनी ताब्यात घेतले असून त्यांना देशाबाहेर नेण्यात आल्याचे ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
एअर स्ट्राईक आणि अमेरिकेची मोठी कारवाई
डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानुसार, अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या लष्करी तळांवर आणि मादुरो यांच्या ठिकाणांवर यशस्वीपणे ‘एअर स्ट्राईक’ केला आहे. या मोहिमेत अमेरिकन लॉ एनफोर्समेंट एजन्सींच्या मदतीने निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला जेरबंद करण्यात आले. ट्रम्प यांनी या मोहिमेला ‘ऐतिहासिक यश’ म्हटले असून लवकरच पत्रकार परिषद घेऊन याबद्दलचा अधिक तपशील देण्याचे संकेत दिले आहेत.
हेही वाचा – Saudi Arabia Airstrike in Yemen : सौदी अरेबियाचा येमेनवर भीषण हवाई हल्ला; 20 ठार, यूएईसोबतचा तणाव शिगेला
संघर्षाची पार्श्वभूमी आणि मादुरो यांचे आरोप
निकोलस मादुरो यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अमेरिकेवर गंभीर आरोप केले होते. अमेरिकेला केवळ व्हेनेझुएलातील अफाट तेल साठ्यावर ताबा मिळवायचा आहे, असा दावा त्यांनी केला होता. ऑगस्ट 2025 पासूनच कॅरेबियन समुद्रात अमेरिकेने मोठ्या प्रमाणावर नौदल तैनात केले होते. यामुळे दोन्ही देशांमधील संघर्ष अटळ मानला जात होता. ट्रम्प यांनी मादुरो प्रशासनावर ड्रग्ज तस्करीचे आरोप करत त्यांच्यावर कडक निर्बंध लादले होते.
"Nicolas Maduro and his wife captured, flown out of country": US President Trump after strikes on Venezuelan capital Caracas Read @ANI Story |https://t.co/zZaDY4ddNr#UnitedStates #Trump #NicolasMaduro #Venezuela #Caracas pic.twitter.com/9qxHjYuMEI — ANI Digital (@ani_digital) January 3, 2026
व्हेनेझुएलाचा निषेध
दरम्यान, व्हेनेझुएला सरकारने अमेरिकन हवाई हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. नागरी वस्त्यांवर आणि लष्करी आस्थापनांवर झालेले हे हल्ले म्हणजे आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मादुरो यांच्या अटकेच्या दाव्यानंतर व्हेनेझुएलामध्ये तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. बलाढ्य अमेरिकेच्या या आक्रमक पावलाला आता व्हेनेझुएलाचे उरलेले सैन्य किंवा त्यांचे मित्र देश कसे प्रत्युत्तर देतात, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.