Mumbai-Bengaluru Vande Bharat: मुंबई आणि बंगळुरू या दोन दक्षिण-पश्चिम भारतातील महत्त्वाच्या शहरांना जोडण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने आता ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेनला अधिकृत मंजुरी दिली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते KSR बंगळुरू दरम्यान ही हाय-स्पीड स्लीपर सेवा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. बंगळुरूचे खासदार पी.सी. मोहन यांनी रेल्वेमंत्र्यांच्या पत्राची प्रत सोशल मीडियावर शेअर करून ही माहिती दिली. ही देशातील दुसरी स्लीपर वंदे भारत ट्रेन ठरणार असून, यामुळे प्रवासाच्या अनुभवात मोठी क्रांती होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले पंतप्रधानांचे आभार
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या मंजुरीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत. फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “मुंबई ते बंगळुरू दरम्यानची ही वंदे भारत स्लीपर सेवा प्रवाशांसाठी अत्यंत परिवर्तनकारी पाऊल ठरेल. वंदे भारतच्या जागतिक दर्जाच्या सुविधा आणि वेगामुळे आता प्रवासाचा अनुभवही गंतव्यस्थानाइतकाच आनंददायी आणि समाधानकारक होईल.” या निर्णयामुळे मुंबई आणि पुणेकरांच्या दळणवळणात मोठी सुधारणा होणार आहे.
23 तासांचा प्रवास आता केवळ 13 तासांत; पुणेकरांनाही मोठा फायदा
सध्या मुंबई ते बंगळुरू दरम्यान ‘उद्यान एक्सप्रेस’ ही प्रमुख दैनंदिन गाडी असून तिला पोहोचण्यासाठी 21 ते 23 तास लागतात, तर पुणे मार्गे जाणारी ‘कोईमतुर एक्सप्रेस’ 19 तास 20 मिनिटे घेते. मात्र, नवीन वंदे भारत स्लीपर ट्रेन हे अंतर अवघ्या 13 तासांत पार करणार आहे. यामुळे प्रवाशांच्या वेळेत किमान 5 ते 8 तासांची मोठी बचत होईल. रेल्वे सूत्रांच्या माहितीनुसार, या मार्गासाठी दोन रेल्वे मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे दोन्ही शहरांतून दररोज रात्री ही सेवा उपलब्ध होऊ शकेल.
?Good news :
New Vande Bharat Sleeper From Mumbai to Bengaluru approved! Thank you, Hon. PM Narendra Modi Ji and Union Minister Ashwini Vaishnaw Ji for approving the Vande Bharat Sleeper train from Chhatrapati Shivaji Maharaj Terminus (CSMT) Mumbai to KSR Bengaluru. This is a… — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 13, 2026
180 किमी वेग आणि आधुनिक सुविधांचे कवच
वंदे भारत स्लीपर ट्रेन ही तिच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी ओळखली जाणार आहे. ही ट्रेन ताशी 180 किमी वेगाने धावण्यास सक्षम आहे. यामध्ये 16 आधुनिक डबे असून एकूण 823 प्रवाशांची आसनक्षमता असेल. जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा, स्वयंचलित दरवाजे, उत्कृष्ट इंटिरिअर आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ‘कवच’ सारख्या यंत्रणा हे या ट्रेनचे मुख्य वैशिष्ट्य आहे. या ट्रेनमुळे व्यापारी, आयटी प्रोफेशनल आणि पर्यटकांना जलद आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.