US Navy Strait of Hormuz Blockade : आखाती देशांतील तणाव आता टोकाला पोहोचला असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची पूर्णपणे सागरी नाकेबंदी करण्याचे आदेश दिले आहेत. या मोहिमेसाठी अमेरिकेने 15 पेक्षा जास्त शक्तिशाली युद्धनौका आणि अत्याधुनिक F-35B Lightning II स्टेल्थ फायटर जेट्स इराणच्या किनारपट्टीवर तैनात केले आहेत. विशेष म्हणजे, अमेरिका आणि इराण यांच्यात वाटाघाटीसाठी दोन आठवड्यांचा युद्धविराम सुरू असतानाही ट्रम्प यांनी हे आक्रमक पाऊल उचलले आहे. ‘यूएस सेंट्रल कमांड’ने दिलेल्या माहितीनुसार, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून इराणच्या बंदरांकडे जाणाऱ्या किंवा तिथून येणाऱ्या सर्व जहाजांची आता कडक तपासणी केली जाणार आहे.
‘यूएसएस त्रिपोली’चा समुद्रात थरार
या नाकेबंदीचे नेतृत्व ‘यूएसएस त्रिपोली’ (USS Tripoli LHA 7) ही महाकाय युद्धनौका करत आहे. अरबी समुद्रात तैनात असलेली ही नौका रात्रीच्या वेळीही उड्डाण मोहिमा राबवत असून, त्यावर F-35B फायटर जेट्स, MV-22 ऑस्प्रे विमाने आणि प्रगत हेलिकॉप्टर सज्ज आहेत. ही युद्धनौका एकाच वेळी 20 हून अधिक F-35B विमानांना हाताळण्यास सक्षम आहे. इराणच्या बंदरांकडे जाणाऱ्या जहाजांना रोखणे आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे हे या ताफ्याचे मुख्य काम आहे. मात्र, इतर देशांच्या बंदरांकडे जाणाऱ्या जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे.
ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून इराणला थेट इशारा दिला आहे. “जर इराणच्या ‘फास्ट-अटॅक’ बोटी आमच्या नाकेबंदीच्या जवळ आल्या, तर त्या तात्काळ नष्ट केल्या जातील,” असे त्यांनी स्पष्ट केले. ट्रम्प यांनी दावा केला आहे की, युद्धात इराणच्या नौदलाचा मोठा भाग आधीच उद्ध्वस्त झाला असून त्यांची 158 जहाजे समुद्राच्या तळाशी गेली आहेत. इराणच्या या छोट्या बोटींना आतापर्यंत अमेरिकेने लक्ष्य केले नव्हते, पण आता त्यांच्यावर ड्रग्ज तस्करांप्रमाणेच वेगवान आणि भीषण कारवाई केली जाईल, असे ट्रम्प यांनी ठणकावून सांगितले आहे.
USS Tripoli (LHA 7) conducts night flight operations while sailing in the Arabian Sea. Tripoli is designed without a traditional well deck, which allows for more F-35B Lightning II stealth fighters, MV-22 Ospreys, helicopters, and extra maintenance space. During peak operations,… pic.twitter.com/zjQO1nOcmK — U.S. Central Command (@CENTCOM) April 13, 2026
चर्चा निष्फळ आणि युद्धाचे सावट
अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. वान्स आणि जारेड कुशनर यांचे शिष्टमंडळ पाकिस्तानमधील शांतता चर्चेनंतर परतल्यानंतर ही नाकेबंदी जाहीर करण्यात आली. 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर सुरू झालेले युद्ध थांबवण्यासाठी कोणताही ठोस करार होऊ शकला नाही. इराणची आर्थिक कोंडी करण्यासाठी आणि त्यांच्या बंदरांवरील व्यवहार ठप्प करण्यासाठी अमेरिकेने हा वेढा घातला आहे. समुद्रातून अमेरिकेत येणारे 98.2 टक्के अंमली पदार्थ रोखण्यात यश मिळाल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. आता इराणच्या बाबतीतही अशीच कडक भूमिका घेतली जाईल, असे ट्रम्प प्रशासनाने स्पष्ट केले आहे.