Navy fighter jet crash : अमेरिकेच्या आयडाहो येथे आयोजित एका भव्य एअर शो दरम्यान अमेरिकन नौदलाच्या दोन लढाऊ विमानांची हवेतच समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातानंतर विमाने जमिनीवर कोसळली आणि त्यांचा मोठा स्फोट झाला. मात्र, सुदैवाने विमानातील चारही क्रू मेंबर्सनी स्फोटाच्या काही क्षण आधी पॅराशूटच्या साहाय्याने सुरक्षितपणे उडी घेतली. असोसिएटेड प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, जमिनीवर उपस्थित असलेल्या कोणत्याही नागरिकांना या अपघातात दुखापत झालेली नाही. या संपूर्ण थरारक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
नेमकी कशी झाली दुर्घटना?
वॉशिंग्टन राज्यातील इलेक्ट्रॉनिक अटॅक स्क्वॉड्रनमधील ‘EA-18G ग्रोव्हलर्स’ प्रकारची ही विमाने माउंटन होम एअर फोर्स बेसवर हवाई कसरती करत होती. रविवारी हा सोहळा सुरू असताना दोन्ही विमाने कसरती दरम्यान एकमेकांच्या अतिशय जवळ आली आणि त्यांची धडक झाली. सोशल मीडियावरील व्हिडिओमध्ये विमानांची धडक झाल्यानंतर ती वेगाने जमिनीच्या दिशेने कोसळताना दिसत आहेत. अपघात होणार असल्याचे लक्षात येताच क्रू मेंबर्सनी विमानाबाहेर उडी घेतली. या घटनेनंतर एअर बेस तातडीने लॉकडाऊन करण्यात आला असून शोचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले.
धडक झाल्यानंतर दोन्ही विमाने काही काळ एकत्र
विमान वाहतूक सुरक्षा तज्ज्ञ जेफ गुझेटी आणि जॉन कॉक्स यांनी या घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. त्यांच्या मते, हवाई प्रदर्शनांमधील उड्डाणे अत्यंत कठीण असतात आणि तिथे चुकांना माफी नसतेच. तज्ज्ञांच्या मते फॉर्मेशन फ्लाईटमध्ये दुसऱ्या विमानाचा अचूक वेध घेत अत्यंत मर्यादित जागेत एकत्र झेपावणे हे वैमानिकांसाठी मोठे आव्हान असते. प्राथमिक दृष्ट्या हा प्रकार वैमानिकाच्या चुकीमुळे घडलेला (पायलट इश्यू) असू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. धडक झाल्यानंतर दोन्ही विमाने काही काळ एकत्र राहिल्यामुळे क्रू मेंबर्सना बाहेर पडण्यासाठी मोलाचा वेळ मिळाला असावा. हवेतील अशा टक्करीनंतर सर्व क्रू मेंबर्स सुखरूप वाचणे ही जागतिक विमान वाहतूक क्षेत्रात अत्यंत दुर्मिळ गोष्ट मानली जाते.
2x EA-18G Growlers of U.S. CRASHED ? today after a midair collision at the Gunfighter Skies Airshow at Mountain Home Air Force Base in Idaho. Footage shows that all the pilots have ejected safely. pic.twitter.com/UllhBRRDxS — INTEL-24 (@Tracking_Live) May 18, 2026
हेही वाचा – Iran on Internet Toll Tax: आधीच जग उर्जा संकटात त्यात इराण ओतणार तेल, संपूर्ण जगाची इंटरनेट सेवा होणार ठप्प?
‘गनफायटर स्काइज’ एअर शोची पार्श्वभूमी
हा थरारक एअर शो ‘गनफायटर स्काइज’नावाने ओळखला जातो. वर्ष 2018 नंतर पहिल्यांदाच या एअर बेसवर या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. अपघाताच्या वेळी व्हिडिओ शूटिंग करणाऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, विमाने एकमेकांपासून दूर जातील असे वाटल्याने तो व्हिडिओ काढत होता, मात्र धडक होताच आणीबाणीच्या सेवांमध्ये अडथळा येऊ नये म्हणून तो लगेच तिथून निघून गेला. कार्यक्रमाच्या आयोजिका किम सायकस यांनी सर्व क्रू मेंबर्स सुरक्षित असल्याने देवाचे आभार मानले आहेत.
सुरक्षा सुधारणा आणि पुढील तपास
असोसिएटेड प्रेसच्या अहवालानुसार, अलीकडच्या वर्षांत अमेरिकेतील एअर शोमधील सुरक्षा नियमांमध्ये बरीच सुधारणा झाली असून प्राणघातक अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. एअर बेसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सर्व क्रू मेंबर्सची प्रकृती स्थिर आहे. या अपघाताचा अधिकृत तपास रीतसर सुरू करण्यात आला आहे. आता तपास अधिकारी या दुर्घटनेतून सुखरूप वाचलेल्या चारही क्रू मेंबर्सचे जबाब नोंदवून घेतील आणि त्यांच्या विधानांच्या आधारे अपघाताच्या मूळ कारणाचा शोध घेतील.
हेही वाचा – Indian citizen killed in Russia: रशियावर युक्रेनचा मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय नागरिकाचा मृत्यू, तिघे जखमी