US Iran Nuclear Talks Updates : अमेरिका आणि इराण यांच्यात सध्या युद्धविराम असला, तरी पडद्यामागे अणुकराराबाबत वाटाघाटींचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत. यादरम्यान अमेरिकेने इराणसमोर अत्यंत कडक भूमिका घेत 5 अटी ठेवल्याची माहिती समोर आली आहे. इराणच्या एका वृत्तसंस्थेने या संदर्भातील वृत्त दिले असून, यामुळे जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच इराणचा 14 मुद्द्यांचा शांतता प्रस्ताव फेटाळून लावला आहे. कोणतीही ठोस सवलत न देता अमेरिका युद्धात न मिळालेल्या गोष्टी वाटाघाटींच्या माध्यमातून मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप इराणी माध्यमांनी केला आहे.
अमेरिकेने इराणसमोर ठेवलेल्या 5 कडक आणि इराणच्या दृष्टीने जाचक अटी
पूर्वीचे निर्बंध आणि धोरणात्मक निर्णयांमुळे झालेल्या आर्थिक व व्यावसायिक नुकसानीसाठी इराणला कोणतीही भरपाई दिली जाणार नाही.
वाटाघाटींचा भाग म्हणून इराणने आपले 400 किलोग्रॅम समृद्ध युरेनियम पूर्णपणे अमेरिकेकडे सुपूर्द करावे.
इराणने आपले इतर प्रकल्प बंद करावेत आणि त्यांचा संपूर्ण देशात फक्त 1 आण्विक (न्यूक्लियर) प्रकल्प कार्यान्वित राहिला पाहिजे.
इराणची परदेशात असलेली आणि गोठवलेली 25 टक्के मालमत्ता मुक्त करण्यास अमेरिकेने स्पष्ट नकार दिला आहे.
इराणने या सर्व अटी मान्य केल्या, तरीही त्यांच्यावर इस्रायलच्या आक्रमणाचा धोका भविष्यात कायम राहील.
इराणच्या उलट अटी आणि अमेरिकेला गंभीर इशारा
इराणी प्रसारमाध्यम ‘मेहर’च्या अहवालानुसार, तेहरानने कोणत्याही प्रकारची चर्चा पुढे नेण्यासाठी स्वतःच्या 5 पूर्वअटी समोर ठेवल्या आहेत. यामध्ये इराणवरील सर्व आर्थिक निर्बंध उठवणे, गोठवलेला निधी मुक्त करणे आणि विशेषतः लेबनॉनमधील संघर्ष पूर्णपणे थांबवणे याचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘होर्मुझ सामुद्रधुनी’वर (Strait of Hormuz) आपल्या सार्वभौमत्वाला मान्यता मिळण्याची मागणी इराणने केली आहे. एका तुर्की वृत्तसंस्थेनुसार, इराणच्या सशस्त्र दलाच्या प्रवक्त्याने अमेरिकेला थेट इशारा दिला आहे की, जर त्यांच्यावर कोणताही नवीन लष्करी हल्ला झाला, तर त्याला पूर्वीपेक्षा अधिक जोरदार आणि गंभीर प्रत्युत्तर दिले जाईल.
हेही वाचा – Indian citizen killed in Russia: रशियावर युक्रेनचा मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय नागरिकाचा मृत्यू, तिघे जखमी
मुत्सद्देगिरीच्या नावाखाली लष्करी उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी अमेरिकेच्या या धोरणावर अत्यंत तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. अमेरिकेकडून लष्करी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी केवळ मुत्सद्देगिरीचा आणि राजनैतिकतेचा आडोसा घेतला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. जागतिक ऊर्जा बाजारपेठेत शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी आपण काम करत असल्याचा अमेरिका आणि इस्रायलचा दावा पूर्णपणे खोटा असून, प्रत्यक्षामध्ये या भागातील अस्थिरता आणि संघर्षाला तेच जबाबदार असल्याचे बकाई यांनी म्हटले आहे.
सोशल मीडियावर इस्रायल आणि अमेरिकेवर तोफ
प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर आपली भूमिका मांडताना लिहिले की, ‘हा अमेरिका आणि इस्रायलचा नेहमीचा धूर्त डाव आहे. हे देश आधी स्वतः संकट आणि युद्ध निर्माण करतात. त्यानंतर स्थैर्य पुनर्संचयित करणे आणि शांततेचे रक्षण करणे या उदात्त नावाखाली तिथली परिस्थिती आणखी चिघळवून टाकतात. ते स्वतः विनाश घडवून आणतात आणि त्याला शांतता प्रस्थापित करणे असे नाव देतात.’ दरम्यान, ‘वायनेट न्यूज’च्या अहवालानुसार, या अटींमुळे दोन्ही देशांमधील वाटाघाटींमध्ये मोठी कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे.
The next grand lie being rolled out to justify their illegal 'war of choice' is the claim that they are 'preserving peace and stability in global energy markets.' In reality, though, it was the reckless warmongering of the U.S. and Israeli regimes that shattered promising… — Esmaeil Baqaei (@IRIMFA_SPOX) May 17, 2026