JNPT Port Fire : उरण हादरलं! जेएनपीटी परिसरातील लॉजिस्टिक पार्कमध्ये भीषण आग; औद्योगिक वसाहतीत कामगारांची पळापळ

एका केमिकल प्लांटमध्ये झालेल्या तीन स्फोटांमुळे संपूर्ण औद्योगिक वसाहत हादरून गेली असून, आगीच्या ज्वाळांनी रौद्र रूप धारण केले आहे.

JNPT Port Fire : उरण हादरलं! जेएनपीटी परिसरातील लॉजिस्टिक पार्कमध्ये भीषण आग; औद्योगिक वसाहतीत कामगारांची पळापळ

JNPT Port Fire : उरण नजीकच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT) परिसरातील जेडब्ल्यूआर लॉजिस्टिक पार्कमध्ये आज दुपारी भीषण अग्नितांडव पाहायला मिळाले. एका केमिकल प्लांटमध्ये झालेल्या तीन स्फोटांमुळे संपूर्ण औद्योगिक वसाहत हादरून गेली असून, आगीच्या ज्वाळांनी रौद्र रूप धारण केले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून अनेक किलोमीटर अंतरावरून काळ्या धुराचे लोट दिसत आहेत.

स्फोटांनी परिसर हादरला
नेहमीप्रमाणे कामकाजाची लगबग सुरू असताना दुपारी अचानक केमिकल प्लांटमध्ये पहिला मोठा स्फोट झाला. त्यानंतर काही मिनिटांतच आणखी दोन तीव्र स्फोट झाले. या स्फोटांचा आवाज इतका भीषण होता की परिसरातील इमारतींच्या खिडक्यांना हादरे बसले. स्फोटानंतर रसायनांनी पेट घेतल्याने आगीने क्षणार्धात भीषण स्वरूप धारण केले. आकाशात पसरलेल्या विषारी धुरामुळे स्थानिक रहिवाशांना श्वास घेण्यासही त्रास होत आहे.

प्रशासनासमोर दुहेरी संकट: वनव्याचा धोका वाढला
अग्निशमन दलाच्या 8 ते 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘फोम’चा मारा केला जात आहे. मात्र, घटनास्थळाच्या भौगोलिक रचनेमुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. ज्या कंपनीला आग लागली आहे, त्याच्या मागील बाजूस डोंगराळ भाग आहे. वाऱ्याच्या वेगामुळे आगीच्या ठिणग्या डोंगरावरील सुक्या गवतावर पडून वनवा पेटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. जर ही आग डोंगरात पसरली, तर ती विझवणे यंत्रणांसाठी अधिक कठीण होणार आहे.

हेही वाचा – Chitra Wagh : पीडित महिलांनी तक्रारीसाठी पुढे यावे; नाशिक TCS प्रकरणी चित्रा वाघ यांचे आवाहन

मोठा आर्थिक फटका; सुदैवाने जीवितहानी नाही
या भीषण दुर्घटनेत सुदैवाने अद्याप कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. स्फोटाचा आवाज येताच कामगारांनी प्रसंगावधान राखून कारखान्याबाहेर धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, या आगीत कंपनीतील कोट्यवधी रुपयांची यंत्रसामग्री, कच्चा माल आणि रसायनांचा साठा जळून खाक झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील इतर कंपन्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. शेजारील इतर केमिकल कंपन्यांपर्यंत ही आग पसरू नये यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number