UPSC Provisional Answer Key: संघ लोकसेवा आयोगाने (UPSC) आपल्या परीक्षा प्रक्रियेत मोठा बदल जाहीर केला आहे. आता नागरी सेवा (Civil Services) पूर्व परीक्षा संपल्यानंतरच आयोग तात्पुरती उत्तरतालिका (Provisional Answer Key) प्रसिद्ध करणार आहे. यापूर्वी आयोगाची पद्धत अशी होती की, पूर्ण भरती प्रक्रिया संपल्यानंतर म्हणजे अंतिम निकाल जाहीर झाल्यावरच उत्तरतालिका आणि गुणपत्रिका सार्वजनिक केली जात होती. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे, ज्यामध्ये आयोगाच्या जुन्या पद्धतीला आव्हान देण्यात आले होते. आता आयोगाने परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि न्याय्यतेसाठी नवा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लाखो उमेदवारांना आपल्या उत्तरांची पडताळणी करण्याची संधी मिळणार आहे.
आता लगेच मिळणार उत्तरतालिका
UPSC च्या नव्या निर्णयानुसार, नागरी सेवा पूर्व परीक्षा झाल्यानंतर काही दिवसांतच तात्पुरती उत्तरतालिका जाहीर केली जाईल. उमेदवारांना त्यावर आक्षेप नोंदवण्याची संधी दिली जाईल, जेणेकरून अंतिम उत्तरतालिका तयार करताना सर्व शंका दूर करता येतील. आयोगाने आपल्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे की प्रत्येक आक्षेपासोबत उमेदवाराने किमान तीन प्रामाणिक स्रोतांचे पुरावे सादर करणे आवश्यक असेल. सादर केलेले सर्व आक्षेप विषयतज्ज्ञांच्या समितीकडून तपासले जातील. या समितीच्या पुनरावलोकनानंतर अंतिम उत्तरतालिका तयार केली जाईल आणि त्यावर आधारित निकाल जाहीर केला जाईल. या प्रक्रियेमुळे परीक्षेचे मूल्यमापन अधिक अचूक आणि विश्वासार्ह होईल, असा आयोगाचा विश्वास आहे.
हेही वाचा – Post Office RD Scheme: फक्त 5 वर्षांत 17 लाख रुपये परत! काय आहे पोस्ट ऑफिस आरडी योजना? जाणून घ्या
पारदर्शकतेकडे मोठे पाऊल
आतापर्यंत आयोग उत्तरतालिका आणि गुणांची माहिती केवळ अंतिम निकालानंतरच देत होता. त्यामुळे अनेक उमेदवारांना त्यांच्या कामगिरीचे विश्लेषण करता येत नव्हते.
नव्या निर्णयामुळे उमेदवारांना परीक्षेनंतर लगेचच स्वतःच्या उत्तरांची पडताळणी करता येईल. तसेच त्यांच्या गुणांकनाबाबत असलेले संभ्रम किंवा तक्रारी तत्काळ दूर करता येतील. तथापी, यामुळे आयोगाच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढेल.
हेही वाचा – RBI: RBIची कडक कारवाई; आरबीआयनं दोन फायनान्स कंपन्यांवर कारवाई करत ठोठावला मोठा दंड
नवीन प्रक्रिया लवकरच लागू
दरम्यान, UPSC ने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, ही नवीन पद्धत शक्य तितक्या लवकर अमलात आणण्याची आयोगाची इच्छा आहे. सध्या नागरी सेवा परीक्षा प्रक्रिया साधारणपणे एक वर्षभर चालते, त्यामुळे पूर्वी मुख्य परीक्षेत पात्र न ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या कामगिरीबाबत कोणतीही माहिती मिळत नव्हती. आता, या बदलामुळे प्रत्येक उमेदवाराला आपल्या उत्तरांची आणि मूल्यमापनाची स्पष्ट कल्पना मिळेल. ज्यामुळे UPSC परीक्षेच्या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येणार आहे.