Guwahati Test : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील गुवाहाटी कसोटी अनेक दृष्टींनी ऐतिहासिक ठरणार आहे. कारण, बारसापारा स्टेडियममध्ये पहिल्यांदाच कसोटी सामना आयोजित होत असून हे भारतातील 30वे रेड-बॉल टेस्ट ठिकाण बनणार आहे. पण या सामन्यात काही नियम अशा पद्धतीने बदलले आहेत की, जागतिक कसोटी क्रिकेटच्या 148 वर्षांच्या इतिहासात हे प्रथमच घडत आहे.
सामना वेळ नेहमीपेक्षा 30 मिनिटे आधी
भारतात सामान्यतः कसोटी सामने 9:30 वाजता सुरू होतात. पण गुवाहाटीमध्ये सामना 9:00 वाजता सुरू होणार आहे. याहूनही महत्त्वाचे म्हणजे जर एखाद्या दिवशी हवामानामुळे षटके कमी पडली, तर पुढील दिवशी सामना 8:30 वाजताही सुरू होऊ शकतो. कारण गुवाहाटीमध्ये या आठवड्यात सूर्यास्त 4:30 वाजताच होत आहे. अशा परिस्थितीत खेळ उशिरा सुरू केला तर खराब प्रकाशामुळे अनेक षटके वाया जाण्याची भीती आहे. त्यामुळे प्लेइंग अवर्स पुढे आणले गेले आहेत.
हेही वाचा – Shubman Gill Health Update: टीम इंडियाला मोठा धक्का! शुभमन गिल गुवाहाटी कसोटीतून बाहेर
जेवणाआधी चहापान
गुवाहाटी टेस्टमध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे ’लंच’ आणि ‘टी’ ब्रेकची अदलाबदल. साधारण कसोटीत लंच आधी दिला जातो आणि चहा नंतर. पण येथे चहापान आधी आणि जेवण नंतर दिलं जाणार आहे.
नवीन वेळापत्रक
पहिले सत्र: 9:00 ते 11:00
चहापान (टी ब्रेक): 11:00 ते 11:40 (40 मिनिटे)
दुसरे सत्र: 11:40 ते 1:20
दुपारचे जेवण (लंच): 1:20 ते 2:00
शेवटचे सत्र: 2:00 ते 4:00 (30 मिनिटे वाढू शकते – म्हणजे 4:30 पर्यंत)
ब्रेकची रचना का बदलली?
गुवाहाटीचे भौगोलिक स्थान ईशान्य बाजूस असून येथे हिवाळ्यात सूर्यास्त खूप लवकर होत असतो. त्यामुळे प्रकाशाची कमतरता, संध्याकाळी वेळेपूर्वी खेळ थांबण्याची शक्यता आणि षटके वाया जाण्याची भीती हे टाळण्यासाठी ICC आणि बीसीसीआयने एकत्रित निर्णय घेत नवीन वेळापत्रक आखले आहे.