Hotel New Rules: तुकाराम मुंढेंचा हॉटेल्सना दणका; आता ग्राहकांना मोफत पाणी देणे बंधनकारक; ‘किचन’साठी जारी केली कडक नियमावली

हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना शुद्ध आणि पिण्यायोग्य पाणी पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देणे आता सर्व व्यावसायिकांना बंधनकारक असणार आहे.

Hotel New Rules: तुकाराम मुंढेंचा हॉटेल्सना दणका; आता ग्राहकांना मोफत पाणी देणे बंधनकारक; ‘किचन’साठी जारी केली कडक नियमावली

Hotel New Rules: महाराष्ट्रातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, धाबे आणि खानावळींसाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ग्राहकाभिमुख आदेश जारी केला आहे. हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना शुद्ध आणि पिण्यायोग्य पाणी पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देणे आता सर्व व्यावसायिकांना बंधनकारक असणार आहे. ग्राहकांनी पाऊल ठेवताच त्यांच्यासमोर थेट विकतच्या पाण्याच्या बाटल्या ठेवता येणार नाहीत. हॉटेल चालकांनी आपल्या आवारात ‘येथे पिण्याचे शुद्ध पाणी मोफत मिळेल’ असा स्पष्ट बोर्ड लावणे गरजेचे आहे. जर ग्राहकाने स्वतःहून बाटलीबंद पाणी मागितले, तरच त्याला ते द्यावे. अन्यथा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा मुंढे यांनी दिला आहे.

‘सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र’ अंतर्गत नवीन नियमावली लागू
राज्यातील जनतेला शुद्ध आणि दर्जेदार अन्न मिळावे यासाठी एफडीएने ‘सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र’ ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत 23 जून रोजी एक विशेष परिपत्रक काढून राज्यातील सर्व अन्न प्रक्रिया केंद्र आणि हॉटेल्सना अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार नोंदणी (Registration) करणे अनिवार्य केले आहे. नुकत्याच झालेल्या शासकीय तपासण्यांमध्ये हॉटेल्सच्या स्वयंपाकघरात अत्यंत अस्वच्छ वातावरण, पुन्हा पुन्हा वापरलेले घातक तेल आणि निकृष्ट दर्जाचे पॅकेजिंग यांसारख्या गंभीर त्रुटी आढळल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शाळकरी मुलांच्या आरोग्याला प्राधान्य देत अन्न सुरक्षेचे नियम कडक करण्यात आले आहेत. याशिवाय, हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी स्वच्छता राखण्याकरिता हँडवॉश, साबण आणि स्वच्छ टॉवेलची सोय करणेही बंधनकारक केले आहे.

हॉटेलच्या किचनसाठी जारी झालेली ‘ही’ नियमावली पाळणे आवश्यक 

स्वच्छता आणि बांधकाम: स्वयंपाकघराच्या भिंती आणि जमिनीवर धुता येण्याजोग्या (Washable) टाईल्स असाव्यात, ज्यातून पाणी झिरपणार नाही.

हवा आणि प्रकाश: किचनमध्ये पुरेशी हवा खेळती असावी आणि धूर बाहेर जाण्यासाठी एक्झॉस्ट फॅन असणे आवश्यक आहे.

अन्नाचे वर्गीकरण: कच्चा माल आणि तयार अन्न ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असावी. तसेच, शाकाहारी आणि मांसाहारी अन्नपदार्थ एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे ठेवावेत.

कीटक नियंत्रण: स्वयंपाकघरात माश्या मारणारे इलेक्ट्रॉनिक फ्लाय ट्रॅप बसवावेत. नियमितपणे पेस्ट कंट्रोल करून परिसर उंदीर, झुरळे आणि पालीमूक्त ठेवावा.

हेही वाचा – Jitendra Awhad: ‘तुकाराम मुंढेंना हटवण्यासाठी 250 कोटींची सुपारी…’; जितेंद्र आव्हाडांचा विधानसभेत खळबळजनक दावा

250 कोटींच्या ‘त्या’ वादग्रस्त आरोपावर मुंढेंची प्रतिक्रिया
दरम्यान, पावसाळी अधिवेशनात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियांनी 250 कोटी रुपये गोळा केल्याचा खळबळजनक आरोप केला होता. या संपूर्ण प्रकरणावर प्रसारमाध्यमांनी आयुक्त मुंढे यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी म्हटल की, ‘मला या कथित प्रकरणाबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही.’ आपले पूर्ण लक्ष अन्न सुरक्षेच्या मोहिमेवर केंद्रित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number