Alibaug Ferry Service: मुंबईकरांचे आवडते पर्यटनस्थळ असलेल्या अलिबागला जाणाऱ्या पर्यटकांच्या चिंतेत भर पडली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा दरम्यान चालणारी प्रवासी फेरी सेवा येत्या 25 मे 2026 पासून बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने घेतला आहे. त्यामुळे पर्यटकांना आता समुद्रमार्गे अलिबागला जाण्यासाठी पुढील तीन महिने वाट पाहावी लागणार आहे.
सुरक्षेसाठी महाराष्ट्र सागरी मंडळाचा मोठा निर्णय
पावसाळ्यात अरबी समुद्र खवळलेला असतो. वादळी वारे आणि मोठ्या लाटांमुळे प्रवासी बोटी उलटण्याची किंवा अपघात होण्याची शक्यता असते. प्रवाशांच्या सुरक्षिततेशी तडजोड नको, या उद्देशाने प्रशासनाने 26 मे ते 31 ऑगस्ट 2026 या कालावधीत ही सेवा स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. 25 मे हा यंदाच्या हंगामातील जलवाहतुकीचा शेवटचा दिवस असेल.
रो-रो फेरीचा आधार कायम
पीएनपी, मालदार आणि अजंठा यांसारख्या खासगी कंपन्यांची गेटवे ते मांडवा सेवा बंद होत असली, तरी काही प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. मांडवा ते भाऊचा धक्का (M2M Ferries) दरम्यानची रो-रो सेवा पावसाळ्यातही सुरू राहणार आहे. यामुळे वाहनधारकांना मोठा आधार मिळेल. दिघी-आगरदांडा मार्गावरील जेट्टी वाहतूकही नियमितपणे सुरू राहील, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पर्यटन व्यवसायावर परिमाण
अलिबाग, नागाव, काशिद आणि मुरुड यांसारख्या पर्यटनस्थळांवर जाण्यासाठी गेटवे-मांडवा फेरी हा सर्वात सोयीचा आणि स्वस्त पर्याय मानला जातो. मात्र, ही सेवा बंद झाल्यामुळे पर्यटकांना आता रस्तेमार्गाचा अवलंब करावा लागेल. रस्तेमार्गाने अलिबागला जाण्यासाठी 3 ते 4 तास लागत असल्याने पर्यटकांच्या नियोजनावर परिणाम होईल. याचा थेट फटका स्थानिक हॉटेल व्यावसायिक, रिसॉर्ट मालक आणि दुकानदारांना बसण्याची शक्यता आहे.
पुन्हा कधी सुरू होणार सेवा?
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर आणि समुद्राची स्थिती पाहून फेरी सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत मांडवा बंदर विभागाकडून आढावा घेतला जाईल. तोपर्यंत पर्यटकांनी रस्तेमार्गाचा किंवा रो-रो फेरीचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.