Maharashtra Heavy Rainfall: पालघर आणि ठाण्यात मुसळधार पावसाचे थैमान; पुढील 24 तास राज्यासाठी महत्त्वाचे; ‘या’ 4 जिल्ह्यांना रेड अलर्ट

हवामान खात्याकडून पालघर, ठाणे, नाशिक आणि पुण्याच्या घाट माथ्यासाठी पुढील 24 तासांचा 'रेड अलर्ट' घोषित करण्यात आला आहे.

Maharashtra Heavy Rainfall: पालघर आणि ठाण्यात मुसळधार पावसाचे थैमान; पुढील 24 तास राज्यासाठी महत्त्वाचे; ‘या’ 4 जिल्ह्यांना रेड अलर्ट

Maharashtra Heavy Rainfall: राज्यात पावसाने पुन्हा एकदा आक्रमक रूप धारण केले असून कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात जलप्रलय सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याकडून पालघर, ठाणे, नाशिक आणि पुण्याच्या घाट माथ्यासाठी पुढील 24 तासांचा 'रेड अलर्ट' घोषित करण्यात आला आहे. ताशी 70 किलोमीटर वेगाने वाहणारे वादळी वारे आणि मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गुजरात सीमेलगत असलेल्या वलसाड आणि उंबरगाव परिसरात झालेल्या विक्रमी पावसामुळे पालघर जिल्ह्यातील बहुतांश नद्या दुथडी भरून वाहत असून पूरस्थिती निर्माण झाली आहे.

कल्याण-डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यात संततधार; सखल भाग पाण्याखाली जाण्याची भीती

ठाणे जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासूनच तुफान पाऊस कोसळत आहे. विशेषतः कल्याण आणि डोंबिवली शहरांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार सरी कोसळत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या या पावसामुळे सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पावसाचा वेग असाच कायम राहिल्यास शहरातील प्रमुख वाहतूक मार्ग खोळंबण्याची आणि नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याची शक्यता असल्याने स्थानिक प्रशासनाने नागरिकांना विनाकारण बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

नाशिकमध्ये गोदावरी नदीची धोक्याची पातळी; गंगापूर धरणातून विसर्ग सुरू

नाशिक आणि परिसर क्षेत्रात झालेल्या धुवांधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरु असल्याने धरणातून गोदावरी पात्रात टप्प्याटप्प्याने हजारो क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. या पुरामुळे रामकुंड परिसरातील मंदिरे आणि रामसेतू पूल पाण्याखाली गेले असून, पुराचे मापक मानल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी पोहोचले आहे. नदीकाठच्या भांडी बाजार, सराफ बाजारासह निफाड, चांदोरी आणि सायखेडा या भागातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या दृष्टीने प्रशासनाने पावले उचलली आहेत.

हेही वाचा – Maharashtra Rain : महाराष्ट्रात 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, पण 'हे' 8 जिल्हे अजूनही कोरडेच; 31 जुलैनंतर…

मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रात 'ऑरेंज' आणि 'यलो' अलर्ट

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मुंबई, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट भागांसाठी 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. तर विदर्भ आणि खान्देशातील धुळे, जळगाव, अमरावती, नागपूर, चंद्रपूर यांसह 14 जिल्ह्यांमध्ये 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. किनारपट्टीच्या भागांत समुद्र खवळलेला राहणार असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number