Top Woman Maoist Leader Rupi Reddy Killed : नक्षलमुक्त भारत मोहिमेची मुदत संपल्यानंतर महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात सुरक्षा दलांनी पहिली मोठी कारवाई केली आहे. माचपल्लीच्या घनदाट जंगलात सोमवारी पहाटे झालेल्या एका भीषण चकमकीत जहाल माओवादी रंगाबोईना भाग्या ऊर्फ रुपी रेड्डी (45) हिला कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले. उत्तर बस्तरमधील माओवादी चळवळीचा महत्त्वाचा दुवा मानली जाणारी रुपी रेड्डी ठार झाल्याने माओवाद्यांना मोठा हादरा बसला आहे. तिच्यावर सरकारने 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. चकमकीनंतर घटनास्थळावरून एक अत्याधुनिक स्वयंचलित रायफल देखील जप्त करण्यात आली आहे.
गुप्त माहिती आणि संयुक्त मोहीम
कांकेर जिल्ह्यातील छोटेबेठिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत माओवाद्यांची हालचाल वाढल्याची पक्की माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे जिल्हा पोलीस दल आणि सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) संयुक्त तुकडीने रविवारी रात्रीपासूनच शोधमोहीम हाती घेतली होती. सोमवारी पहाटे 4 च्या सुमारास जंगलात दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला, ज्याला चकमकीच्या रूपात प्रत्युत्तर देण्यात आले. यादरम्यान अनेक माओवादी घनदाट झाडीचा फायदा घेत पसार झाले असून परिसरात अजूनही शोधमोहीम सुरू आहे.
पतीच्या मृत्यूनंतरही सक्रिय होती रुपी
मूळची तेलंगणा राज्यातील रहिवासी असलेली रुपी रेड्डी ही छत्तीसगडमधील नक्षली चळवळीतील तेलंगण कॅडरचा शेवटचा दुवा मानली जात होती. ती 2004 पासून नक्षल चळवळीत सक्रिय होती आणि माड डिव्हिजनच्या विभागीय समितीची सदस्य म्हणून कार्य पाहत होती. तिचा पती विजय रेड्डी हा देखील जहाल माओवादी होता. तो 13 ऑगस्ट 2025 रोजी मोहल्ला-मानपूर येथील चकमकीत ठार झाला होता. पतीच्या मृत्यूनंतर शस्त्र खाली टाकण्याऐवजी रुपीने चळवळीची सूत्रे हाती घेऊन हिंसाचारी कारवाया सुरूच ठेवल्या होत्या.
उत्तर बस्तरमध्ये माओवाद्यांची मोठी हानी
रुपी रेड्डी ठार झाल्याने परतापूर क्षेत्रीय समिती आणि उत्तर बस्तरमधील माओवाद्यांची मोठी फळी कोलमडली आहे. सुरक्षा दलांच्या या निर्णायक विजयामुळे माओविरोधी मोहिमेला मोठी गती मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून माओवाद्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवणाऱ्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा यशस्वी हल्ला चढवण्यात आला. माचपल्लीच्या जंगलात झालेली ही चकमक नक्षलवाद विरोधातील लढ्यातील एक महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे.