Ram Temples In India : अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या भव्य मंदिराच्या उद्घाटनानंतर संपूर्ण देश राममय झाला आहे. अयोध्येप्रमाणेच भारताच्या कानाकोपऱ्यात प्रभू रामांची अनेक प्राचीन आणि भव्य मंदिरे आहेत, ज्यांचा इतिहास रामायणाशी आणि श्रद्धेशी खोलवर जोडलेला आहे. यातील काही मंदिरे तर अशी आहेत जिथे स्वतः भगवान श्रीकृष्ण रामाची पूजा करायचे. तुम्हाला ही मंदिरे आणि यांच्याशी जोडलेल्या रंजक कथा माहिती आहेत का?
1. रामराजा मंदिर, ओरछा (मध्य प्रदेश)
अयोध्येनंतर हे सर्वात महत्त्वाचे राम मंदिर मानले जाते. येथे प्रभू रामाची पूजा देवाच्या रूपात नाही तर 'राजा' म्हणून केली जाते. ओरछा येथील राणी कुंवरी गणेश ही रामाची मोठी भक्त होती असे म्हणतात. तिने त्याला अयोध्येतून बालस्वरूपात आणले होते. ओरछा हे जगातील एकमेव ठिकाण आहे जिथे प्रभू रामाला दररोज 4 वेळा पोलिसांकडून 'गार्ड ऑफ ऑनर' (बंदुकीची सलामी) दिली जाते.
2. काळाराम मंदिर, नाशिक (महाराष्ट्र)
नाशिकच्या पंचवटीत असलेले हे मंदिर ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रभू राम वनवासाच्या काळात याच ठिकाणी राहिले होते असे मानले जाते. 1782 मध्ये बांधलेल्या या मंदिरात राम, लक्ष्मण आणि सीतेच्या 2 फूट उंचीच्या काळ्या पाषाणाच्या मूर्ती आहेत. अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाराम मंदिरातून 11 दिवसांच्या विशेष विधीची सुरुवात केली होती.
3. त्रिप्रयार श्रीराम मंदिर, त्रिशूर (केरळ)
त्रिशूर जिल्ह्यातील या मंदिरात भगवान राम त्रिप्रयारप्पन किंवा त्रिप्रयार थेवर म्हणून ओळखले जातात. या मंदिराची कथा थक्क करणारी आहे. असे मानले जाते की, या मंदिरात असलेल्या रामाच्या मूर्तीची पूजा साक्षात भगवान श्रीकृष्ण द्वारकेत करत असत. श्रीकृष्णाने देह ठेवल्यानंतर ही मूर्ती संपूर्ण द्वारकेसह आपोआप समुद्रात विसर्जित झाली आणि नंतर मच्छिमारांना सापडली. त्यांनी ती केरळच्या चेट्टुवा भागात स्थापित केली गोली. नंतर वक्काइल कमल नावाच्या स्थानिक शासकाने त्रिप्रयार येथे मंदिर बांधले आणि तेथे मूर्तीची स्थापना केली. मंदिरात रामाची मूर्ती चार हातांनी शंख, चक्र, धनुष्य आणि माला धारण केलेली दिसते.
4. रामास्वामी मंदिर, कुंभकोणम (तामिळनाडू)
कुंभकोणम येथील हे मंदिर 400 वर्षांपूर्वी राजा रघुनाथ नायकर यांनी बांधले होते. शत्रुघ्न आणि भरत यांच्यासह राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती मंदिरात आहेत. येथे गर्भगृहात राम आणि सीता विवाहाच्या मुद्रेत बसलेले दिसतात. विशेष म्हणजे येथे भरत शाही छत्र धरलेला आणि शत्रुघ्न पंखा धरलेला अशा दुर्मिळ मुद्रेत दिसतात.
5. कोदंडराम मंदिर, चिकमंगळूर (कर्नाटक)
चिकमंगळूर येथील या मंदिराला कोदंडराम असे नाव पडले आहे, कारण येथे भगवान राम आणि लक्ष्मण त्यांच्या धनुष्य आणि बाणांसह दाखवले गेले आहेत आणि भगवान रामाचे धनुष्य कोदंड म्हणून ओळखले जाते. या मंदिराची एक आगळी-वेगळी कहाणी ऐकायला मिळते. सामान्यतः सीता माता रामाच्या डाव्या बाजूला असते, पण येथे ती रामाच्या उजव्या बाजूला आहे. हिंदू विवाह विधीमध्ये वधू वराच्या उजव्या बाजूला बसते, त्याप्रमाणे येथे ही रचना आहे. कारण, एका भक्त पुरुषोत्तमने भगवान राम आणि सीता यांचा विवाह पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि त्यामुळे त्याची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी राम-सीता अशा प्रकारे विराजमान झाले.
6. सीता रामचंद्रस्वामी मंदिर, भद्राचलम (तेलंगणा)
गोदावरी नदीच्या काठी वसलेले हे मंदिर 'भद्राचलम मंदिर' म्हणून प्रसिद्ध आहे. ते तेलंगणातील भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यात आहे. रामनवमीला येथे श्रीराम आणि सीतेचा विवाह सोहळा अत्यंत थाटामाटात साजरा केला जातो. असे म्हटले जाते की, वनवासाच्या काळात भगवान राम, सीता आणि लक्ष्मण भद्राचलमपासून 35 किमी दूर पर्णशाला येथे राहिले. सीतेला वाचवण्यासाठी श्रीलंकेला जात असताना भगवान रामाने गोदावरी नदी ओलांडली होती, असे स्थानिक लोक सांगतात. त्याच ठिकाणी नदीच्या उत्तरेला भद्राचलम मंदिर आहे. येथे भगवान विष्णूने भद्राच्या प्रार्थनेवरून 'चतुर्भुज' रामाच्या रूपात दर्शन दिले होते.
7. रघुनाथ मंदिर, जम्मू
हे उत्तर भारतातील सर्वात मोठे मंदिर संकुल मानले जाते. 1853 ते 1860 या काळात महाराजा गुलाब सिंग आणि त्यांचे पुत्र रणबीर सिंग यांनी हे मंदिर बांधले. या संकुलात एकूण 7 मंदिरे असून मुख्य देवता प्रभू श्रीराम आहेत.
8. श्री राम तीरथ मंदिर, अमृतसर (पंजाब)
हे मंदिर अमृतसरच्या पश्चिमेला 12 किलोमीटरवर चोगवान रोडवर आहे. हे ते ठिकाण आहे, जिथे सीतेला वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात आश्रय मिळाला होता. इथेच सीतेने लव आणि कुश यांना जन्म दिला होता, अशी मान्यता आहे. येथे एक पायऱ्या असलेली प्राचीन विहीर असून सीता माता तिथे स्नान करत असे, असे मानले जाते.
9. राम मंदिर, भुवनेश्वर (ओडिशा)
हे मंदिर भुवनेश्वरच्या खारावेला नगरजवळ आहे. भुवनेश्वर शहराच्या मध्यभागी असलेल्या या मंदिरात राम, लक्ष्मण आणि सीतेच्या अत्यंत सुंदर मूर्ती आहेत. याशिवाय मंदिर परिसरात हनुमान, शंकर आणि इतर देवतांची मंदिरं देखील आहेत. हे मंदिर एका खाजगी ट्रस्टद्वारे चालवले जाते आणि भाविकांच्या श्रद्धेचे मोठे केंद्र आहे.
10. श्री रामनाथस्वामी मंदिर, रामेश्वरम
हिंदू धर्मात रामेश्वरम या शहराला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण याच ठिकाणी राम सेतूची निर्मिती करण्यात आली होती. भारतीय द्वीपकल्पाच्या अगदी टोकावर वसलेले हे मंदिर 12 व्या शतकात बांधले गेले. लंकेला जाण्यापूर्वी प्रभू रामाने ज्या शिवलिंगाची पूजा केली होती, तेच शिवलिंग या मंदिरात प्रस्थापित आहे.
हेही वाचा – Ram Navami 2026 : रामनवमीला 'नवपंचम' राजयोगाचा शुभ संयोग! 'या' राशींना मिळणार पदोन्नती आणि व्यवसायात नफा