Maharashtra Weather Update: देशातील वातावरणात वेगाने हालचाली होत असून बंगालच्या उपसागरात एक तीव्र हवामान बदल दिसून येत आहे. उत्तर-पश्चिम उपसागराच्या भागात उगम पावलेली ही प्रणाली आगामी 24 तासांत अधिक शक्तिशाली होऊन कमी दाबाच्या पट्ट्यात परावर्तित होईल, असे संकेत भारतीय हवामान खात्याने (IMD) दिले आहेत. या नव्या मान्सून प्रणालीचा थेट प्रभाव महाराष्ट्रावर पडणार असून राज्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढण्याची चिन्हे आहेत.
पुणे अन् रायगडमध्ये जोरदार हजेरी
मागील 24 तासांत राज्याच्या काही भागांत निसर्गाचा रुद्रावतार पाहायला मिळाला. विशेषतः कोकणपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. पुणे जिल्ह्यातील मुळशी भागात 17 सेमी तर रायगडच्या कर्जत परिसरात 15 सेमी एवढ्या मोठ्या पावसाची नोंद झाली आहे. 26 आणि 27 जुलैच्या दरम्यान कोकणातील किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
विदर्भ-मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
फक्त पश्चिम महाराष्ट्रच नव्हे, तर विदर्भ आणि मराठवाड्याच्या बहुतांश भागात 26 ते 30 जुलैदरम्यान ढगांच्या गडगडाटासह पाऊस हजेरी लावेल. या कालावधीत ताशी 40 ते 60 किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. 'शीयर झोन' आणि मान्सूनच्या प्रभावामुळे राज्यातील प्रमुख शेती क्षेत्राला या पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांना सतर्कतेचे निर्देश; शेतात पाणी साचू न देण्याचे आवाहन
पावसाचा वाढता जोर पाहता हवामान विभागाने बळीराजासाठी महत्त्वाची नियमावली (ॲडव्हायझरी) प्रसिद्ध केली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भातील भात, सोयाबीन, कापूस, आले आणि भाजीपाला पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतात अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा तातडीने निचरा करावा, असे सांगण्यात आले आहे. तसेच, वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू असताना नागरिकांनी व शेतकऱ्यांनी झाडांखाली आश्रय न घेता सुरक्षित ठिकाणी राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.