गेल्या दीड वर्षांमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला होता. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर परिस्थिती काही प्रमाणात स्थिरावली होती. परंतु, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. कोरोनासह ओमायक्रॉन रुग्णही मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. त्यातच आता मंत्रालयातही ओमायक्रॉन विषाणूने शिरकाव केला आहे. मंत्रालयातील तिघांना ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
मंत्रालयात तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. मंत्रालयातील २ पोलीस आणि १ लिपिक ओमायक्रॉनग्रस्त असल्याचे समोर आले आहे. यामुळे प्राशसकीय यंत्रणा सतर्क झाली असून या तिघांनाही केडीएमसीच्या विलगीकरण केंद्रात दाखल करण्यात आले आहे. मंत्रालयामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची दर आठ दिवसांनी आरटीपीसीआर चाचणी करण्यात येते. आणि त्यानुसार कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असता या तिघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
राज्यात गुरुवारी ओमायक्रॉनचे १९८ नवे रुग्ण आढळले आहेत. तर मुंबईत ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. मुंबईत १९० नागरिकांना ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ४५०वर पोहचली आहे.