US Iran Peace Talks : जगभरात शांततेची आशा निर्माण झालेली असतानाच, अमेरिका आणि इराणमधील चर्चेतील तणाव पुन्हा एकदा विकोपाला गेला आहे. पाकिस्तानच्या मध्यस्थीने 40 दिवसांच्या भीषण युद्धानंतर अवघ्या दोन आठवड्यांसाठी युद्धविराम जाहीर झाला होता. मात्र, इस्लामाबादमध्ये सुरू असलेल्या वाटाघाटींदरम्यान अमेरिकेने इराणला एक जबरदस्त धक्का दिला आहे, ज्यामुळे हा युद्धविराम संपुष्टात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इराणने आपली जप्त केलेली संपत्ती मुक्त करण्याची प्रमुख अट अमेरिकेसमोर ठेवली होती, परंतु अमेरिकेने ही संपत्ती सोडण्यास स्पष्ट नकार दिला आहे. या निर्णयामुळे शांतता चर्चेला खीळ बसली असून मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे ढग दाटले आहेत.
इराणची संपत्ती आणि अमेरिकेचा पवित्रा
इस्लामाबादमधील चर्चेत इराणने दोन प्रमुख मागण्या केल्या होत्या. पहिली म्हणजे जप्त केलेली राष्ट्रीय संपत्ती परत करणे आणि दुसरी म्हणजे इस्रायलने लेबनॉनवर सुरू असलेले हल्ले थांबवणे. अमेरिकेने इराणची आर्थिक कोंडी कायम ठेवल्याने इराण कमालीचा संतापला आहे. शांतीवार्ता सुरू असतानाच अमेरिकेने घेतलेल्या या कठोर भूमिकेमुळे मध्यस्थीचे किंवा युद्ध रोखण्याचे प्रयत्न वाया जाण्याची शक्यता दिसू लागली आहे.
स्ट्रेट ऑफ होर्मुजवरील कोंडी कायम
युद्धविराम जाहीर झाला तरी जगावर असलेले ऊर्जा संकट अद्याप टळलेले नाही. अमेरिकेने 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' (Strait of Hormuz) हा जलमार्ग तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र, इराणने हा मार्ग पूर्णपणे खुला न करता, एका दिवसात केवळ 15 जहाजांनाच परवानगी दिली जाईल, अशी भूमिका घेतली आहे. यामुळे जागतिक तेल आणि वायू पुरवठ्यावर मोठा परिणाम होत असून, बाजारपेठेत अस्थिरता कायम आहे.
ब्रिटनची लष्करी कारवाईची धमकी
इराणने जलमार्ग मोकळा न केल्यामुळे आता ब्रिटनने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानांनी या संदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा केली असून, 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'वर थेट सैन्य कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. जर ब्रिटन किंवा नाटो देशांनी लष्करी बळाचा वापर केला, तर दोन आठवड्यांचा हा युद्धविराम तातडीने संपून पुन्हा एकदा महायुद्धासारखी परिस्थिती उद्भवू शकते, असा इशारा आंतरराष्ट्रीय राजकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
इस्रायलकडून केले जाणारे हल्ले
अमेरिकेने इराणसोबत शस्त्रसंधी केल्यानंतर इस्रायलने लेबनॉनविरोधात आघाडी उघडली. इराणने वाटाघाटी घडवून आणण्यासाठी आधी हे हल्ले थांबवण्याचा आग्रह धरला आहे. मात्र, इस्रायलने स्वतःचे लक्ष्य सोडणार नसल्याची भूमिका घेतल्यामुळे आधीच या शांतता चर्चेवर तणावाचे वातावरण होते. आता अमेरिकेच्या कडक भूमिकेमुळे चर्चाच थांबून पुन्हा युद्धाची ठिणगी पडते की काय, असे चित्र दिसू लागले आहे.