PMC Bomb Threat: पुणे महानगरपालिकेचे मुख्य कार्यालय आणि महापौर कार्यालयाला बॉम्बने उडवण्याचा धमकीचा ई-मेल आल्याने आज प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. महापालिकेच्या अधिकृत ई-मेल आयडीवर हा धमकीचा संदेश प्राप्त झाला. घटनेचे गांभीर्य ओळखून महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या आदेशानुसार तातडीने संपूर्ण मुख्य इमारत रिकामी करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सध्या पालिका आवारात कोणालाही प्रवेश दिला जात नाहीये.
धमकीच्या ई-मेलची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन, बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) तसेच श्वान पथक (Dog Squad) तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सुरक्षेचा उपाय म्हणून संपूर्ण इमारतीची नाकेबंदी केली असून सर्व मुख्य प्रवेशद्वार बंद केले आहेत. पालिका इमारतीमधील सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून, ते सध्या गेटबाहेर थांबून आहेत. सुरक्षा यंत्रणांकडून इमारतीमधील प्रत्येक मजल्याची, विभागांची आणि संवेदनशील कोपऱ्यांची कसून तपासणी केली जात आहे.
सायबर पोलिसांकडून तपास सुरू
हा धमकीचा मेल कोणी आणि कुठून पाठवला, याचा शोध घेण्यासाठी आता पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेची (Cyber Cell) मदत घेतली जात आहे. हा प्रकार केवळ एखाद्याने भीती पसरवण्यासाठी केलेला खोडसाळपणा आहे की यामागे काही गंभीर कट आहे, यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, महापालिका परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पोलिसांची तपासणी पूर्ण झाल्यानंतरच याबद्दल अधिकृत माहिती दिली जाईल.
पुण्यातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
पुणे शहरात गेल्या काही काळापासून हत्या, दरोडे, महिलांवरील अत्याचार आणि ‘कोयता गँग’ची दहशत यांसारख्या गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच आता थेट शहराच्या सर्वोच्च प्रशासकीय इमारतीलाच बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने पुणेकरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक उरला आहे की नाही, असा थेट सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.