Nashik Cloudburst Warning: महाराष्ट्रभर पावसाने थैमान घातलेले असतानाच आता नाशिकमध्ये पुढील 24 तासांत तीव्र हवामान बदलाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका प्रशासन संपूर्णपणे सज्ज झाले असून, मनपा आयुक्त मनीषा खत्री आणि महापौर हिमगौरी आडके यांनी संयुक्तपणे नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची नियमावली जारी केली आहे. शहरात उद्या 200 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस कोसळण्याची म्हणजेच ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज संध्याकाळी 6 वाजेपासून पावसाला सुरुवात होऊन मध्यरात्री 1 ते सकाळी 10 वाजेपर्यंत पावसाचा जोर अत्यंत तीव्र असेल. हा संभाव्य धोका लक्षात घेऊन सुरक्षेचा उपाय म्हणून उद्या नाशिकमधील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
'जिथे आहात तिथेच सुरक्षित राहा'; महापौरांचे 'वर्क फ्रॉम होम'चे निर्देश
नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांनी आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. उद्याचा अत्यंत तीव्र पावसाचा अंदाज पाहता नागरिकांनी आधीच आपल्या घरात खाण्यापिण्याच्या आणि आवश्यक वस्तूंचा पुरेसा साठा करून ठेवावा, जेणेकरून बाहेर पडण्याची गरज भासणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, नोकरदारांनी उद्या कार्यालयात न जाता 'वर्क फ्रॉम होम' करावे आणि अतिशय गंभीर वैद्यकीय अडचण असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. शहरात कुठेही जुने पडके वाडे, धोकादायक इमारती किंवा उन्मळून पडू शकणारी झाडे आढळल्यास तात्काळ मनपा प्रशासनाला कळवावे, जेणेकरून संभाव्य दुर्घटना वेळीच टाळता येतील.
गोदाकाठ परिसरात 'हाय-अलर्ट'; मान्सून टास्क फोर्स 24 तास तैनात
ढगफुटीच्या या इशाऱ्यामुळे नाशिक जिल्हा प्रशासन पूर्णपणे 'अलर्ट मोड'वर आले असून गोदावरी नदीच्या किनारपट्टीवरील नागरिकांना पोलीस व महापालिकेकडून सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. नदीपात्राचा प्रवाह वेगाने वाढणार असल्याने नदीकाठच्या परिसरात विनाकारण फिरण्यास आणि तेथे वाहने उभी करण्यास कडक मनाई करण्यात आली आहे. महापालिकेने यासाठी एक विशेष 'मान्सून टास्क फोर्स' तैनात केला असून, हा फोर्स शहरातील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. पाऊस आणि पुराचा धोका वाढल्यास नदीकाठची घरे रिकामी करून बाधित नागरिकांसाठी तात्पुरत्या निवाऱ्याची आणि रुग्णवाहिकांची चोख व्यवस्था प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.