Nylon Manja Ban : मकर संक्रांतीच्या सणात पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा 'नायलॉन मांजा' आता सर्वसामान्यांच्या जिवावर उठला आहे. या प्राणघातक मांजामुळे होणारे अपघात आणि मृत्यू रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. या प्राणघातक मांजाचा वापर करणाऱ्यांवर आणि तो विकणाऱ्यांवर प्रत्येकी 50 हजार ते अडीच लाख रुपयांपर्यंतचा दंड आकारण्याचा प्रस्ताव न्यायालयाने ठेवला असून, यावर अंतिम सुनावणी 5 जानेवारी 2026 रोजी होणार आहे.
मुलांच्या चुकीचा फटका पालकांना बसणार
न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, जर एखादा अल्पवयीन मुलगा नायलॉन मांजाने पतंग उडवताना आढळला, तर त्यासाठी त्याच्या पालकांना जबाबदार धरले जाईल आणि त्यांना 50 हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. सज्ञान व्यक्ती आढळल्यास थेट संबंधित व्यक्तीवर ही दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. प्रशासनाच्या सुस्त कारभारावर ताशेरे ओढत न्यायालयाने 2021 पासून प्रलंबित असलेल्या जनहित याचिकेवर हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
पोलिस प्रशासनाचीही जबाबदारी निश्चित
केवळ नागरिकच नव्हे, तर आता पोलिस अधिकारीही न्यायालयाच्या रडारवर आले आहेत. ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत नायलॉन मांजाची विक्री किंवा त्यामुळे दुर्घटना घडेल, त्या भागातील संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलिस आयुक्त आणि अधीक्षकांना देण्यात आले आहेत. 29 डिसेंबरपर्यंत सर्व उपायुक्तांना यासंदर्भात रीतसर सूचना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
27 डिसेंबरला वर्तमानपत्रांत जाहीर नोटीस
या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना 27 डिसेंबर रोजी प्रमुख वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या नोटीसद्वारे जनतेकडून हरकती आणि सूचना मागवण्यात येणार आहेत. दोषींना आपली बाजू मांडण्याची संधी देऊनच दंडाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असेही खंडपीठाने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा – Meenakshi Shinde : बालेकिल्ल्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांचा राजीनामा
न्यायालयाची तीव्र नाराजी
गेल्या तीन वर्षांत नायलॉन मांजाच्या वापरात कोणतीही घट न झाल्याबद्दल न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे. नायलॉन मांजा केवळ मानवासाठीच नाही तर पक्ष्यांच्या जिवासाठीही धोकादायक ठरत आहे. त्यामुळे यावर्षी प्रशासनाने कोणतीही कसर न सोडता कठोर कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.