Sanju Samson Viral Video: भारतीय क्रिकेट संघाने 2026 च्या टी-20 विश्वचषकाच्या जेतेपदावर आपले नाव कोरले असून, संघाने सलग दुसऱ्यांदा विश्वविजेतेपदाचा बहुमान पटकावला आहे. अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 96 धावांनी धुव्वा उडवल्यानंतर भारतीय खेळाडू मैदानावर जल्लोषात मग्न असतानाच, या संपूर्ण विजयाचा खरा शिल्पकार संजू सॅमसन आपल्या साधेपणाने पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. मैदानावर सुरू असलेल्या उत्सवात संजूच्या शांत वृत्तीने चाहत्यांच्या काळजाचा ठाव घेतला आहे.
सेलिब्रेशनच्या गर्दीत संजूचा ‘एकांत’
भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर मैदानावर अत्यंत भावनिक आणि उत्साही वातावरण होते. एकीकडे हार्दिक पांड्या आणि इशान किशन विजयाचा डान्स करत होते, तर इतर खेळाडू आपल्या कुटुंबीयांसोबत फोटो काढण्यात व्यस्त होते. मात्र, ज्या खेळाडूने संपूर्ण स्पर्धेत आपल्या बॅटने धावांचा पाऊस पाडला, तो संजू सॅमसन ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ची ट्रॉफी घेऊन एका शांत कोपऱ्यात बसून हा सर्व सोहळा निवांत पाहत होता. प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनी संजूच्या या साधेपणाची दखल घेत त्याच्याशी संवाद साधला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, “स्वतःची योग्यता सिद्ध करण्यासाठी नेहमीच कॅमेऱ्यासमोर असण्याची गरज नसते,” अशा शब्दांत नेटकरी संजूचे कौतुक करत आहेत.
संजूने मोडले अनेक जागतिक विक्रम
संजू सॅमसनसाठी हा विश्वचषक कारकिर्दीतील सुवर्णक्षण ठरला आहे. केवळ शांत स्वभावच नाही, तर आपल्या आक्रमक फलंदाजीने त्याने प्रतिस्पर्धी गोलंदाजांची झोप उडवली. संजूने या स्पर्धेत नोंदवलेली आकडेवारी थक्क करणारी आहे:
एकूण धावा: 5 सामन्यांत तब्बल 321 धावा करून तो भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.
सरासरी आणि स्ट्राईक रेट: त्याने 80.25 च्या सरासरीने आणि 199.37 च्या तुफानी स्ट्राईक रेटने फलंदाजी केली.
सिक्सर किंग: संपूर्ण स्पर्धेत 24 षटकार खेचत एकाच विश्वचषकात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम संजूने आपल्या नावे केला.
हेही वाचा – ICC Penalty: विश्वचषकाच्या विजयानंतर ‘या’ खेळाडूला ICC चा दणका; अंतिम सामन्यातील ‘त्या’ कृतीसाठी ठोठावला दंड
दरम्यान, महत्त्वाच्या आणि दडपणाच्या सामन्यांमध्ये संजू सॅमसन अधिक प्रभावी ठरला. त्याने बाद फेरीच्या सामन्यांमध्ये (Knockout Stages) सलग 97, 89 आणि अंतिम सामन्यात पुन्हा एकदा 89 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करून भारताचा विजय निश्चित केला. त्याच्या या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याला मानाच्या ‘मालिकावीर’ (Player of the Tournament) पुरस्काराने गौरवण्यात आले. झगमगाटापासून दूर राहून शांतपणे आपली जबाबदारी पार पाडण्याच्या संजूच्या या संयमी वृत्तीने जगभरातील क्रिकेट प्रेमींना भुरळ घातली आहे.