Jejuri Fire: जेजुरी नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) दणदणीत विजयाचा जल्लोष सुरू असतानाच एका भीषण आगीच्या दुर्घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. खंडोबा गडाच्या पायथ्याशी विजयाचा भंडारा उधळत असताना अचानक आगीचा मोठा भडका उडाला. या आगीत नवनिर्वाचित नगरसेवकांसह 16 जण भाजले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नेमकं काय घडलं?
रविवारी दुपारी जेजुरी नगरपरिषदेचा निकाल जाहीर झाला, ज्यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने सत्तांतर घडवून आणले. विजयानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवक खंडोबाच्या दर्शनासाठी गडाच्या पहिल्या पायरीपाशी आले होते. खंडेरायाचा जयघोष करत भंडारा उधळला जात होता आणि त्याच वेळी फटाक्यांची मोठी आतिषबाजी सुरू होती. फटाक्यांची ठिणगी हवेत उडणाऱ्या भंडाऱ्याच्या संपर्कात येताच आगीचा मोठा लोळ उठला.
भेसळयुक्त भंडाऱ्याचा संशय
या दुर्घटनेनंतर जेजुरीतील 'भेसळयुक्त भंडाऱ्याचा' प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भंडाऱ्यात ज्वालाग्राही रसायनांची भेसळ असल्यानेच फटाक्यांच्या ठिणगीने इतका भीषण भडका घेतल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या आगीत कार्यकर्त्यांसह विजयाचा आनंद साजरा करणारे काही नगरसेवकही होरपळले आहेत. जखमींना तातडीने स्थानिक सरकारी आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जेजुरीत सत्तांतर, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बाजी
या दुर्घटनेपूर्वी निवडणुकीच्या निकालात मोठे सत्तांतर पाहायला मिळाले. माजी आमदार संजय जगताप यांची सत्ता उलथवून लावत अजित पवार गटाचे जयदीप बारभाई यांनी नगराध्यक्षपदी दणदणीत विजय मिळवला. राष्ट्रवादीने 17 जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता काबीज केली. भाजपने सर्व जागा लढवूनही त्यांना केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागले. तथापी, एका जागेवर अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आहे.