Salman Khan On Rajpal Yadav: अलीकडेच संपन्न झालेल्या ‘स्क्रीन अवॉर्ड्स 2026’ मध्ये अभिनेता राजपाल यादव यांच्या वैयक्तिक कायदेशीर प्रकरणावर करण्यात आलेल्या टिप्पणीमुळे सोशल मीडियावर वादाला तोंड फुटले होते. या वादाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूडचा ‘भाईजान’ सलमान खान याने राजपाल यादव यांच्या समर्थनार्थ एक खास पोस्ट शेअर केली आहे. “तुम्ही 30 वर्षांपासून काम करत आहात आणि आम्ही सर्वजण तुमच्या कामाची कदर करतो,” अशा शब्दांत सलमानने राजपाल यांना दिलासा दिला आहे.
नेमका वाद काय? सूत्रसंचालकाची ‘ती’ टिप्पणी
रविवारी मुंबईत झालेल्या पुरस्कार सोहळ्यात राजपाल यादव यांच्या चेक बाऊन्स प्रकरणाचा संदर्भ देत सूत्रसंचालकाने एक टिप्पणी केली होती. “राजपाल भाई, डॉलर कितीही वर-खाली झाला तरी, तुम्हाला जेवढे पैसे उसने घेतले आहेत, तेवढेच परत करावे लागतील,” असे सूत्रसंचालक म्हणाले होते. यावर प्रेक्षकांमध्ये हास्य पिकले असले तरी, सोशल मीडियावर अनेकांनी याला ‘असंवेदनशील’ म्हटले. राजपाल यादव या टिप्पणीमुळे काही काळ गोंधळलेले दिसले आणि त्यांनी “मला फक्त समस्या समजावून सांगायची आहे,” असे म्हणत परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला.
सलमानची ‘लाखमोलाची’ साथ: “काम तर मिळतच राहील”
वाढता वाद पाहून सलमान खानने ‘X’ (ट्विटर) वर राजपाल यादव यांच्यासाठी एक पोस्ट लिहिली. सलमान म्हणाला, “राजपाल भाई, तुम्ही 30 वर्षांपासून या क्षेत्रात आहात. आम्ही वारंवार तुमची प्रशंसा केली आहे कारण तुम्हाला तुमच्या कामाची किंमत कळते. डॉलर वर जावो किंवा खाली, तुम्हाला भरपूर काम मिळत राहील, कारण शेवटी सर्व काही भारतातच द्यायचे आहे.” सलमानने राजपाल यांना त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचे आणि मनापासून काम करत राहण्याचे आवाहन केले आहे. सलमानच्या या कृतीचे चाहत्यांकडून भरभरून कौतुक होत आहे.
Rajpal bhai aap 30 yrs se kaam kar rahe ho aur hum sabne aapko repeat kiya hai baar baar kyunki aap apna kaam jante ho aur ek value laate ho , kaam toh aapko bohot milega aur issi dollar rate pe milega aur milte rahega . Hakikat yeh hai .
Aur yeh yaad rakhna ke kabhi kabhi flow… pic.twitter.com/CzE86CCYXH — Salman Khan (@BeingSalmanKhan) April 7, 2026
राजपाल यादव यांनी स्पष्ट केली भूमिका
वाद वाढल्यानंतर स्वतः राजपाल यादव यांनीही सोशल मीडियावर एक व्हिडिओ संदेश जारी करून स्पष्टीकरण दिले. त्यांनी पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालक सौरभ द्विवेदी आणि झाकीर खान यांना टॅग करत म्हटले की, हे सर्व केवळ गंमतीने केले गेले होते. “सौरभ आणि झाकीर हे दोघेही माझ्या लहान भावांसारखे आहेत आणि त्या वक्तव्याचा मी कोणताही राग धरलेला नाही,” असे यादव यांनी स्पष्ट केले. यामुळे या वादावर आता पडदा पडला असला तरी सलमानच्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.