Marathi Reel Star Death : सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला आणि आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा लोकप्रिय मराठी रिलस्टार प्रथमेश कदम याचे निधन झाले आहे. आपल्या आईसोबतचे मजेशीर व्हिडीओ आणि डान्समुळे तो प्रचंड प्रसिद्ध होता. त्याच्या निधनाच्या बातमीने सोशल मीडियावरील त्याचे लाखो चाहते आणि मित्रपरिवार हळहळ व्यक्त करत आहे.
मित्र तन्मय पाटेकरकडून निधनाची पुष्टी
प्रथमेशचा जवळचा मित्र आणि स्वतः सोशल मीडिया स्टार असलेल्या तन्मय पाटेकरने ही दुःखद बातमी सर्वांसोबत शेअर केली. तन्मयने आपल्या पोस्टमध्ये म्हटले, "तू सदैव आठवणीत राहशील प्रथमेश, देवाघरी स्वतःची काळजी घे रे! तुझी खूप आठवण येईल. मिस यू भाई." या पोस्टनंतर सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहणाऱ्यांचा ओघ सुरू झाला आहे.
आजारपणातही मनोरंजन सुरूच; आईसोबतची जोडी होती विशेष लोकप्रिय
प्रथमेश हा केवळ एक कलाकार नव्हता, तर त्याने आपल्या कौटुंबिक नात्यांनाही रिल्सच्या माध्यमातून ग्लॅमर मिळवून दिले होते. प्रथमेशची आई प्रज्ञा कदम यादेखील सोशल मीडियावर अतिशय सक्रिय आहेत. प्रथमेशने आपल्या आई आणि बहिणीसोबत अनेक हीट व्हिडीओ दिले होते. तो गेल्या काही काळापासून आजारी होता, मात्र हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाही त्याने चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी व्हिडीओ बनवणे थांबवले नव्हते.
दरम्यान, 5 जानेवारी रोजी प्रथमेशने आपल्या नवीन गाण्याचा एक व्हिडीओ शेअर केला होता. तोच त्याचा सोशल मीडियावरील शेवटचा सहभाग ठरला. त्यानंतर कोणतीही पोस्ट न आल्याने चाहते चिंतेत होते आणि आता थेट त्याच्या निधनाची बातमी समोर आल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.