Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala 2026: पंढरीच्या विठू माऊलीच्या चरणी लीन होण्यासाठी आतूर झालेल्या वारकऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू यांच्या वतीने आषाढी वारी पायी पालखी सोहळ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यंदाचे हे पालखी सोहळ्याचे 341 वे वर्ष असून, ज्येष्ठ वद्य सप्तमी म्हणजेच मंगळवार, 7 जुलै रोजी संत तुकोबांची पालखी मुख्य देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान करेल. या पार्श्वभूमीवर देहूनगरीत जय्यत तयारी सुरू झाली आहे.
रथ ओढण्यासाठी 3 नव्या बैलजोड्यांची खरेदी
यंदाच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या सुयोग्य नियोजनासाठी संस्थानतर्फे ह.भ.प. विक्रमसिंह उमराज मोरे, ह.भ.प. उमेश सुरेश मोरे आणि ह.भ.प. लक्ष्मण दत्तात्रय मोरे या 3 प्रमुख विश्वस्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. यंदाचा पालखी सोहळा अधिक सुकर करण्यासाठी संस्थानने पालखी रथासाठी नवीन व्यवस्था केली असून, रथ ओढण्यासाठी विशेषत्वाने 3 नव्या बैलजोड्यांची खरेदी केली आहे. वेळापत्रकानुसार, 7 जुलैला प्रस्थान झाल्यानंतर पालखीचा पहिला विसावा इनामदार वाड्यात असेल. त्यानंतर 8 जुलैला येथून पुढे मार्गस्थ होताना सुफी संत अनगडशा बाबा यांच्या दर्ग्यात पालखीची मानाची पहिली आरती केली जाईल आणि त्यानंतर हा वैष्णवांचा मेळा पंढरीच्या दिशेने कूच करेल.
पालखी सोहळ्याचा संपूर्ण प्रवास मार्ग
देहूवरून निघालेली पालखी आकुर्डी येथील श्री विठ्ठल मंदिर (9 जुलै) आणि पुण्याच्या नाना पेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात (10 व 11 जुलै) मुक्कामी असेल. त्यानंतर लोणी काळभोर (12 जुलै), यवत (13 जुलै), वरवंड (14 जुलै), उंडवडी गवळ्याची (15 जुलै) आणि बारामतीच्या शारदा विद्यालयाच्या प्रांगणात (16 जुलै) विसावेल. पुढे सणसर (17 जुलै), निमगाव केतकी (18 जुलै), इंदापूर (19 जुलै), सराटी (20 जुलै – जेथे नीरा नदीत पवित्र स्नान होईल), अकलूज (21 जुलै), बोरगाव श्रीपूर (22 जुलै), पिराची कुरोली (23 जुलै) असा प्रवास करत 24 जुलै रोजी पालखी वाखरी येथे पोहोचेल. 25 ते 28 जुलै दरम्यान हा सोहळा पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीच्या मुख्य उत्सवासाठी मुक्कामी असेल, आणि 29 जुलै रोजी दुपारनंतर पालखी देहूच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू करेल.
आठशे वर्षांची वारी परंपरा
विठ्ठलाच्या वारीला 800 हून अधिक वर्षांचा समृद्ध इतिहास आहे. जात-पात, गरीब-श्रीमंत आणि लहान-मोठा असा कोणताही भेदभाव विसरून लाखो भाविक या वारीत सामील होतात. एकमेकांना 'माऊली' म्हणून साद घालत नमस्कार करण्याची ही अनोखी परंपरा संपूर्ण जगाला समतेचा संदेश देते. वारीमध्ये पंचपक्वान्नाची हाव न धरता रस्त्याच्या कडेला पिठलं-भाकरीचा आस्वाद घेत, एकाच पात्रात जेवण करत वारकरी विठ्ठल नामाच्या गजरात दंग होतात. वयोवृद्धांपासून ते तरुणांपर्यंत अवघ्या महाराष्ट्राला दरवर्षी या अलौकिक सोहळ्याची तीव्र प्रतीक्षा असते.