नाशिकच्या सप्तशृंगी देवी मंदिरात चोरट्यांनी दानपेटीवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे मंदिर परिसरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या चोरट्यांनी सीसीटीव्हीला चुना फासत ही चोरी केली आहे. विशेष म्हणजे घटनेला वीस दिवस उलटूनही अद्याप याबाबत गुन्हाच दाखल नसल्याचे समोर आले आहे.
सप्तशृंगी मंदिरातील दानपेटीत ही चोरी १३ फेब्रुवारी रोजीची घटना आहे. मात्र वीस दिवस उलटूनही याबाबत कोणालाही कल्पना नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिवाय चोरीबाबत अद्याप गुन्हा देखील दाखल नसल्याने चर्चांना उधाण आले आहे. विश्वस्त दीपक पाटोदकर यांनी संस्थान अध्यक्षांना तात्काळ गुन्हा दाखल करण्याच्या दृष्टीने पत्र दिले आहे. अज्ञात चोरट्यांनी मंदिर परिसरातील दानपेटी असलेल्या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याला चुना फासत ही चोरी केली आहे. या चोरीत किती रक्कम चोरट्यांनी पळवली आहे? किंवा अन्य काही चोरुन नेले आहे का? याबाबत अद्याप माहिती नाही. या चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतरच सत्य काय ते समोर येईल. मात्र दुसरीकडे देवीच्या मंदिरातच चोरट्यांनी डल्ला टाकल्याने खळबळ उडाली आहे.
चोरट्याने दानपेटीवर डल्ला मारतानाच दानपेटीत भाविकांनी टाकलेल्या अनेक नोटा अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आल्या आहेत. मंदिर परिसरात सुरक्षारक्षकांसह सीसीटीव्हीसारखा कडा पहारा असताना या चोरीमुळे एकूणच सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मंदिराची पहिली पायरी, गणपती मंदिर, रामटप्पा तसेच ज्या ठिकाणी दानपेटी ठेवल्या आहेत तेथे सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या चोरट्याने दानपेटीवर डल्ला मारताना आपल्याला कोणी पकडू नये, यासाठी सीसीटीव्ही कॅमेरावर चक्क पांढऱ्या रंगाचा चुना फासून चोरी केली आहे.