Solapur Municipal Election 2026 : सोलापुरात भाजपला ‘जय महाराष्ट्र’! शिंदे-अजित पवार गटाची हातमिळवणी

महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याने अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी यांनी एकत्र येत भाजपला धक्का दिला आहे.

Solapur Municipal Election 2026 : सोलापुरात भाजपला ‘जय महाराष्ट्र’! शिंदे-अजित पवार गटाची हातमिळवणी

Solapur Municipal Election 2026 : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत एक अत्यंत अनपेक्षित आणि खळबळजनक वळण पाहायला मिळाले आहे. महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याने अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी यांनी एकत्र येत भाजपला धक्का दिला आहे. या दोन पक्षांच्या नव्या युतीमुळे सोलापूरच्या राजकारणात भाजप आता एकाकी पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

भाजपला डावलून '51-51' चा फॉर्म्युला निश्चित

सोलापूर महापालिकेत वर्चस्व मिळवण्यासाठी शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांनी 51-51 जागांचा समान वाटा उचलत युतीची अधिकृत घोषणा केली आहे. "भाजपसोबत जागावाटपाची चर्चा फिस्कटल्यानंतर आम्ही शहराच्या विकासासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे," असे शिंदे गटाचे नेते सिद्धराम म्हेत्रे यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, राज्याचे नगरविकास आणि अर्थ खाते या दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडे असल्याने निधीची चिंता नसल्याचा विश्वासही म्हेत्रे यांनी व्यक्त केला आहे.

जागावाटपावरून भाजपशी बिनसले

शिंदे गटाने भाजपसोबत युती करण्यासाठी 40 जागांची मागणी केली होती. मात्र, भाजपने केवळ 8 जागा देऊ केल्याने शिंदे गटामध्ये मोठी अस्वस्थता होती. "आम्ही 26 जागांवर ठाम होतो, पण भाजपने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही," असे सांगत म्हेत्रे यांनी भाजपशी काडीमोड घेण्याचे कारण स्पष्ट केले.

दत्तात्रय भरणे यांची भूमिका ठरली निर्णायक

दरम्यान, काल कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचा सोलापूर दौरा या युतीसाठी 'गेमचेंजर' ठरला. सुरुवातीला स्वबळावर लढण्याचा पवित्रा घेणाऱ्या अजित पवार गटाने भरणे आणि म्हेत्रे यांच्या चर्चेनंतर तातडीने शिवसेनेशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला. या वेगवान हालचालींमुळे महायुतीतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.

सोलापुरातील राजकीय समीकरणे बदलणार

या नव्या प्रयोगामुळे भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आल्याने सोलापुरातील मतांचे गणित पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. शहर विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या या दोन पक्षांची ताकद आता भाजपला रोखण्यात किती यशस्वी ठरते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number