Mira Bhayandar Leopard Attack : मीरा भाईंदर येथे दाट लोकवस्तीच्या इमारतींमध्ये शिरलेल्या बिबट्याला अखेर वनविभागाच्या पथकाने सुमारे सहा ते सात तासांच्या अथक प्रयत्नांनंतर जेरबंद केलं. बिबट्याच्या हल्ल्यात सात जण जखमी झाले. यात एका तरुणीचा समावेश असून तिचं अवघ्या तीन दिवसानंतर लग्न होतं. परंतु, बिबट्याच्या हल्ल्यात तरुणीच्या चेहऱ्यावर आणि हाताला गंभीर जखमा झाल्या आहेत. जखमी तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असं परिवहन मंत्री तथा स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. बिबट्याच्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
प्राप्त माहितीनुसार, भाईंदर पूर्वेच्या स्वामी नारायण मंदिर रोड परिसरातील पारिजात इमारतीच्या बी-विंग मधील 101 क्रमांकाच्या घरात बिबट्या शिरला होता. त्यात घरातील तीन जणांवर त्याने हल्ला केला. यात एक 23 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तर इतर दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. तर बिबट्याने इमारतीमध्ये घुसविण्यापूर्वी अजून चार जणांवर हल्ला केला होता. शुक्रवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून बिबट्या इमारतीच्या परिसरात होता. शेवटी तो एका घरात घुसला. त्याला पकडण्यासाठी वनविभागाच्या पथकाने गुंगीचे औषध दिले. अखेर त्याला सात ते आठ तासानंतर जेरबंद करण्यात प्रशासनाला यश आले आहे. या बिबट्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आलं आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सकाळी साडेनऊ वाजता बिबट्या रेस्क्यू करण्यासाठी ऑपरेशन सुरू करण्यात आले. त्यानंतर दुपारी अडीच वाजता त्याला बेशुद्ध करण्यात आले. सदरची रेस्क्यू कारवाईही पालिका, पोलीस, अग्निशमन विभाग व वन विभागांनी एकत्रित केली आहे. यावेळी मंत्री प्रताप सरनाईक, आमदार नरेंद्र मेहता, आदी पदाधिकारी उपस्थित होते.