Crime News: उत्तर प्रदेशातील आंबेडकरनगर जिल्ह्यातील अकबरपूरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका महिलेने आपल्याच चार निष्पाप मुलांना विटेने डोके ठेचून संपवलं. मिरानपूर परिसरात शनिवारी दुपारी ही घटना उघडकीस आली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. गुन्हा केल्यानंतर आरोपी महिला फरार झाली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.
सौदीतील पतीच्या दुसऱ्या लग्नामुळे टोकाचे पाऊल
प्राथमिक तपासात या गुन्ह्यामागील धक्कादायक कारण समोर आले आहे. आरोपी महिलेचा पती, नियाज, गेल्या अनेक वर्षांपासून सौदी अरेबियामध्ये नोकरी करत आहे. तिथे असताना त्याने एका पाकिस्तानी महिलेशी दुसरा विवाह केला होता. पतीच्या या निर्णयामुळे पत्नी प्रचंड मानसिक तणावात आणि नैराश्यात होती. याच रागातून आणि मानसिक छळातून तिने स्वतःच्या पोटच्या पोरांचा बळी घेतल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
रक्ताने माखलेले मृतदेह आणि बंद दरवाजा
पोलिसांना दुपारी 3 वाजेच्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली. जेव्हा पोलीस मिरानपूर येथील घरात पोहोचले, तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, एकाच पलंगावर चार मुलांचे रक्ताने माखलेले मृतदेह आढळले. मृतांमध्ये 14, 12, 10 आणि 8 वर्षांच्या मुलांचा समावेश आहे. आईने मुलांच्या डोक्यावर विटेने वार करून त्यांचा जीव घेतल्याचे फॉरेन्सिक तपासात प्राथमिकरीत्या दिसून आले आहे.
आरोपी आईच्या अटकेसाठी पोलिसांची पथके तैनात
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP) प्राची सिंह यांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी सांगितले की, "35 वर्षीय महिलेने हे भीषण कृत्य केले असून ती सध्या बेपत्ता आहे. आरोपी महिलेला पकडण्यासाठी पोलिसांची विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. पतीच्या दुसऱ्या लग्नामुळे ती सतत मानसिक तणावात होती, ही बाब तपासात समोर आली आहे." याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून फॉरेन्सिक पथक अधिक पुरावे गोळा करत आहे.