Sangamner Shocker: संगमनेर तालुक्यातील घारगावमधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. परिसरात 4 डिसेंबर रोजी मुळा नदीच्या पुलाखाली एका अर्भकाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. मात्र, तपास लागताच या प्रकरणाचे धक्कादायक सत्य बाहेर आले आहे. या चिमुकल्याला त्याच्या स्वतःच्या आई-वडिलांनीच संपवल्याचं समोर आलं आहे.
मृतदेह नदीपात्रात फेकला
घारगावकडून नदीकाठी गेलेल्या स्थानिकांना पुलाखाली बाळाचा मृतदेह दिसून आला. पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी शोधमोहीम सुरू केली. या दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखा आणि घारगाव पोलीस एकत्रितपणे तपास करत असताना या प्रकरणात वापरलेली कार जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथील असल्याचे उघड झाले.
पालकांवर संशय; चौकशीत कबुली
गावात चौकशी केल्यानंतर मृत बालकाचे आई-वडील प्रकाश पंडित जाधव आणि कविता प्रकाश जाधव यांच्यावर संशय बळावला. त्यांच्यासोबत कार चालक हरिदास गणेश राठोड यालाही पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी सुरू केली. चौकशीत अखेर तिघांनीही सत्य कबूल केले. त्यांच्या कबुलीनुसार, शिवांश नावाचा मुलगा जन्मतः आजारी होता व त्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची शक्यता नसल्याने आई-वडिलांनीच त्याचा गळा दाबला. तथापी, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो घारगावच्या मुळा नदीच्या पुलाखाली फेकून दिला.
प्रकरणाने संतापाची लाट
चिमुकल्याचा जीव घेऊन त्याला दूर नदीत फेकून देण्याचा निर्णय पालकांनी घेतल्याचे समोर आल्यानंतर परिसरात संताप उसळला आहे. पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.