IND vs SA: भारतीय क्रिकेट संघाची विजयी घोडदौड अखंड सुरू असून टी-20 विश्वचषक 2024 नंतर सलग सातव्यांदा द्विपक्षीय मालिका जिंकण्याचा पराक्रम टीम इंडियाने केला आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 30 धावांनी पराभव करत मालिका 3-1 अशी आपल्या नावावर केली. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करत भारताने हार्दिक पंड्या आणि तिलक वर्मा यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर 20 षटकांत 5 गडी गमावून 232 धावा केल्या. प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ चांगल्या सुरुवातीनंतरही 20 षटकांत 201 धावांपर्यंतच मजल मारू शकला.
गोलंदाजांची अचूक कामगिरी
दरम्यान, 232 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेने क्विंटन डी कॉक आणि रीझा हेंड्रिक्स यांच्या सलामी जोडीच्या जोरावर आक्रमक सुरुवात केली. पहिल्या सहा षटकांत धावसंख्या 67 पर्यंत पोहोचली. मात्र, वरुण चक्रवर्तीने रीझा हेंड्रिक्सला 13 धावांवर बाद करत भारताला पहिला यशस्वी ब्रेक दिला.
यानंतर क्विंटन डी कॉक आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांनी दुसऱ्या विकेटसाठी झटपट 51 धावांची भागीदारी केली. ही धोकादायक जोडी जसप्रीत बुमराहने क्विंटन डी कॉकला 65 धावांवर बाद करत फोडली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या विकेट्स झपाट्याने पडल्या आणि 135 धावांपर्यंत संघाचे अर्धे फलंदाज तंबूत परतले. कर्णधार एडेन मार्कराम केवळ 6 धावांवर बाद झाला. भारताकडून वरुण चक्रवर्तीने 4 षटकांत 53 धावा देत 4 बळी, तर जसप्रीत बुमराहने 4 षटकांत अवघ्या 17 धावा देत 2 बळी घेतले. अर्शदीप सिंग आणि हार्दिक पंड्या यांनीही प्रत्येकी एक बळी मिळवला.
हेही वाचा – Sanju Samson: काळजाचा ठोका चुकला! संजूचा ‘तो’ शॉट लागताच पंच मैदानातच कोसळले; पहा व्हिडीओ
That winning feeling ?#TeamIndia captain Surya Kumar Yadav lifts the @IDFCFIRSTBank T20I Series Trophy ? #INDvSA | @surya_14kumar pic.twitter.com/VVJAQH2B9f — BCCI (@BCCI) December 19, 2025
हार्दिक-तिलकची दमदार फलंदाजी
भारताच्या डावात तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्या यांनी सामन्याची दिशा ठरवली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेल्या तिलक वर्माने 42 चेंडूत 73 धावांची संयमी पण आक्रमक खेळी केली. कर्णधार हार्दिक पंड्याने तर फक्त 25 चेंडूत 63 धावांची तडाखेबंद खेळी करत प्रेक्षकांना भारावून टाकले. याशिवाय संजू सॅमसनने 37 आणि अभिषेक शर्माने 34 धावांचे उपयुक्त योगदान दिले. या एकत्रित कामगिरीच्या जोरावर भारताने मोठी धावसंख्या उभारली आणि अखेर सामना तसेच मालिका जिंकली. या विजयासह टीम इंडियाने टी-20 क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व अधोरेखित करत सातत्यपूर्ण यशाची परंपरा कायम राखली आहे.