FIFA World Cup 2026 : जगातील सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा FIFA World Cup 2026 चा थरार अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडाच्या संयुक्त यजमानपदाखाली आजपासून (11 जून 2026) सुरू होत आहे. या स्पर्धेत भारतीय संघ सहभागी नसला तरी भारतीय वंशाचे चार प्रतिभावान खेळाडू वेगवेगळ्या देशांचे प्रतिनिधित्व करत जागतिक मंचावर आपली छाप पाडण्यासाठी सज्ज आहेत. पंजाब, केरळ आणि तमिळनाडूशी नाते सांगणारे हे खेळाडू आपल्या कामगिरीमुळे भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहेत.
सरप्रीत सिंगकडून न्यूझीलंडच्या अपेक्षा
27 वर्षीय सरप्रीत सिंग हा न्यूझीलंड संघाचा महत्त्वाचा आक्रमक मिडफिल्डर आहे. त्याचे कुटुंब मूळचे पंजाबमधील जालंधर येथील असून त्याचा जन्म न्यूझीलंडमध्ये झाला आहे. गेल्या 8 वर्षांपासून तो राष्ट्रीय संघाचा अविभाज्य भाग राहिला आहे. युरोपातील दिग्गज क्लब FC Bayern Munich कडून खेळण्याचा मान मिळवणाऱ्या मोजक्या भारतीय वंशाच्या फुटबॉलपटूंमध्ये त्याची गणना होते. अचूक पासिंग आणि उत्कृष्ट बॉल कंट्रोल ही त्याची प्रमुख ताकद मानली जाते.
केरळशी नाळ असलेला कतारचा उदयोन्मुख तारा
20 वर्षीय तहसीन मोहम्मद जमशीद हा कतारकडून विश्वचषकात खेळणारा भारतीय वंशाचा युवा खेळाडू आहे. त्याचे आई-वडील मूळचे केरळचे आहेत. फॉरवर्ड आणि विंगर या दुहेरी भूमिकेत खेळणारा तहसीन हा प्रसिद्ध कतार स्टार्स लीगमध्ये खेळणारा पहिला भारतीय वंशाचा फुटबॉलपटू ठरला आहे. त्याच्या निवडीमुळे भारतातील क्रीडा क्षेत्रातही त्याचे विशेष कौतुक झाले होते.
ऑस्ट्रेलियाच्या आक्रमणाची धुरा निशान वेलुपिल्लईच्या खांद्यावर
24 वर्षीय निशान वेलुपिल्लई हा ऑस्ट्रेलियाच्या आक्रमण फळीतील महत्त्वाचा खेळाडू मानला जातो. त्याची आई अँग्लो-इंडियन असून वडिलांचे मूळ श्रीलंकन-तमिळ वंशाशी संबंधित आहे. स्ट्रायकर आणि विंगर म्हणून खेळणाऱ्या निशानने ऑस्ट्रेलियासाठी केवळ 6 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 3 गोल नोंदवत प्रभावी कामगिरी केली आहे. त्याची वेगवान खेळशैली आणि गोल करण्याची क्षमता प्रतिस्पर्धी संघांसाठी मोठे आव्हान ठरू शकते.
सॅम्युएल मुथुसामीचा अनुभव कॉंगोसाठी महत्त्वाचा
29 वर्षीय सॅम्युएल मुथुसामी हा कॉंगो संघाचा अनुभवी डिफेन्सिव्ह मिडफिल्डर आहे. फ्रान्समध्ये जन्मलेल्या सॅम्युएलची आई कॉंगोची असून वडील तमिळ वंशाचे आहेत. या चार खेळाडूंमध्ये त्याच्याकडे सर्वाधिक आंतरराष्ट्रीय अनुभव असून त्याने कॉंगोसाठी तब्बल 57 सामने खेळले आहेत. मध्यफळीत संघाला स्थिरता देणे आणि प्रतिस्पर्ध्यांचे आक्रमण रोखणे ही त्याची खासियत मानली जाते.
भारतीय चाहत्यांचे लक्ष या चौघांच्या कामगिरीकडे
यंदाच्या FIFA World Cup 2026 मध्ये भारताचा संघ मैदानात नसला तरी भारतीय वंशाच्या या चार खेळाडूंच्या कामगिरीकडे देशातील फुटबॉलप्रेमींचे विशेष लक्ष असणार आहे. जागतिक फुटबॉलच्या सर्वोच्च मंचावर हे खेळाडू आपल्या देशांसाठी कशी कामगिरी करतात आणि भारतीय वंशाचा ठसा किती प्रभावीपणे उमटवतात, याबाबत क्रीडाप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता आहे.