Lucknow Shocker: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील दोडा खेडा-जलालपूर परिसरात एकाच कुटुंबातील दोन तरुण बहिणींनी आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्वतःचे आजारपण, घरातील गरिबी आणि त्यातच जीव लावलेल्या पाळीव कुत्र्याचा आजार सहन न झाल्याने या दोन्ही बहिणींनी फिनॉल पिऊन आपले आयुष्य संपवले.
उपचारादरम्यान दोन्ही बहिणींचा मृत्यू
मृतांची ओळख राधा सिंग (26) आणि तिची धाकटी बहीण जिया सिंग (22) अशी पटली आहे. 24 डिसेंबर रोजी दुपारी या दोघींनी घरात फिनॉल प्राशन केले होते. प्रकृती खालावल्यानंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान राधाचा मृत्यू झाला, तर जियाला पुढील उपचारासाठी केजीएमयू (KGMU) मध्ये हलवण्यात आले होते, मात्र तिथे तिनेही अखेरचा श्वास घेतला.
नैराश्य आणि कुत्र्याशी असलेले भावनिक नाते
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही बहिणी गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर नैराश्याने (Depression) ग्रस्त होत्या. राधा 2014 पासून मानसिक तणावात होती, तर जियाला क्षयरोगाचा (TB) आजार होता. या बहिणींनी अलीकडेच एक कुत्रा दत्तक घेतला होता, ज्याच्याशी त्या भावनिकदृष्ट्या खूप जोडल्या गेल्या होत्या. गेल्या एक महिन्यापासून तो कुत्राही आजारी होता. कुत्र्याची खालावलेली प्रकृती पाहून या दोघी प्रचंड तणावाखाली होत्या, असे तपासात समोर आले आहे.
बाहेरील जगाशी तुटलेला संपर्क
अतिशय शांत स्वभावाच्या असलेल्या या दोन्ही बहिणी मोबाईल फोन किंवा सोशल मीडियाचा वापर करत नव्हत्या. त्या सतत घरातच राहायच्या. त्यांच्या घरातील परिस्थितीही बेताची असून त्यांचे आई-वडील देखील सतत आजारी असतात. घरात केवळ एक भाऊ असून तो कंत्राटदार म्हणून काम करतो. नैराश्यामुळे त्या अनेकदा रागाच्या भरात घरातील वस्तूंची तोडफोडही करत असत.
पोलीस तपास सुरू
पारा पोलीस स्टेशनचे प्रभारी सुरेश सिंग यांनी सांगितले की, या घटनेचा कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही. मुलींची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांच्या आईने शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलावले होते. पोलिसांनी दोन्ही मृतदेहांचे व्हिसेरा जतन केले असून ते फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.