Pune Porsche Accident: पुण्यातील कल्याणी नगर भागात 19 मे 2024 रोजी घडलेल्या हिट अँड रन अपघाताने शहरात खळबळ उडवली होती. भरधाव पोर्शे कारने दुचाकीस्वार दोन जणांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेतील मुख्य आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याला बाल न्याय मंडळासमोर हजर केले गेले. या प्रकरणाबाबत आता मोठी अपडेट समोर येत आहे. आरोपी मुलाचे वडील, धनाढ्य बिल्डर विशाल अग्रवाल याला न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. न्यायालयाने विशाल अग्रवालचा जामीन पुन्हा फेटाळला आहे. तो 17 महिन्यांपासून पोलीस कोठडीत आहे. आरोपी मुलाला वाचवण्यासाठी विशाल अग्रवालने रक्ताचे नमुने बदलण्याचा कट रचल्याचा आरोप पोलीस तपासात समोर आला होता. या युक्तीसाठी फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे यांच्याशी व्हॉट्सअॅप आणि फोनवर संपर्क साधल्याचेही तपासात निष्पन्न झाले होते.
हेही वाचा – Jalgaon Crime : चार दिवसांच्या शोध मोहिमेचा असा झाला शेवट; नऊ वर्षीय बेपत्ता मुलीचा मृतदेह विहिरीत सापडला
पोलीस तपासात असे समोर आले की, आरोपी मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यासाठी अग्रवाल आणि तावरे यांनी ससून रुग्णालयातील डॉ. श्रीहरी हळनोर यांच्याशी सॅम्पल कचऱ्यात फेकण्याची योजना रचली होती. या कारस्थानामुळेच मुलाचे रक्ताचे नमुने बदलले गेले. 21 मे 2024 रोजी पुणे पोलिसांनी विशाल अग्रवाल याला छत्रपती संभाजीनगरहून अटक केली होती.
विशाल अग्रवालचा जामीन पुन्हा फेटाळला
यावेळी, मुंबई उच्च न्यायालयाने विशाल अग्रवालचा जामीन पुन्हा फेटाळल्याने तो जेलमध्येच राहणार आहे. तसेच, डॉ. अजय तावरे यांचाही जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज समाज माध्यमांवर आल्यावर देशभरात जोरदार चर्चा झाली होती. आरोपी अल्पवयीन मुलाला फक्त निबंध लिहिण्याची शिक्षा दिल्यामुळेही प्रकरण सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये चर्चेत आले. शहरातील या धक्कादायक घटनेने पुण्यातील वातावरण चांगलंच तापवले होते.