Solapur Labyrinth: सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी वनक्षेत्रात इतिहासाचा एक अनमोल ठेवा उघड झाला असून, पुरातत्वशास्त्राच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा शोध मानला जात आहे. येथील गवताळ प्रदेशात चक्क 15 वर्तुळांचे एक भव्य 'चक्रव्यूह' सापडले आहे. हे केवळ महाभारतातील कथेची आठवण करून देणारे नसून, प्राचीन भारत आणि रोम यांच्यातील व्यापाराचा एक जिवंत पुरावा असल्याचे समोर आले आहे.
वन्यजीव निरीक्षणातून इतिहासाचा उलगडा
विशेष म्हणजे, हे चक्रव्यूह कोणत्याही उत्खननातून नव्हे, तर 'नेचर कंझर्व्हेशन सर्कल' या संस्थेच्या वन्यजीव निरीक्षणादरम्यान समोर आले. पप्पू जमादार, नितीन अनवेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांची टीम या भागात दुर्मिळ पक्षी आणि लांडग्यांचा अभ्यास करत असताना त्यांना दगडांची ही आगळीवेगळी रचना दिसली. त्यांनी तात्काळ पुरातत्वशास्त्रज्ञ सचिन पाटील यांना याची माहिती दिली आणि या शोधाचे गांभीर्य स्पष्ट झाले.
चक्रव्यूहाची वैशिष्ट्ये आणि 'रोमन' कनेक्शन
पुण्यातील डेक्कन कॉलेजच्या तज्ज्ञांनी या स्थळाचा सखोल अभ्यास केला आहे. भारतात सामान्यतः कमी वर्तुळांचे चक्रव्यूह आढळतात, मात्र 15 वर्तुळे असलेले हे देशातील पहिलेच आणि सर्वात मोठे चक्रव्यूह ठरण्याची शक्यता आहे. ही रचना सुमारे 2000 वर्षांपूर्वीची (इ.स. 1 ले ते 3 रे शतक) असल्याचे मानले जाते. हे चक्रव्यूह जमिनीपासून साधारण 1 ते 1.5 इंच उंचीवर असून लहान दगडांच्या सहाय्याने बनवण्यात आले आहे. यामध्ये बाहेरून थेट मध्यभागी जाण्यासाठी एक निश्चित मार्ग आहे. या चक्रव्यूहाची ठेवण त्या काळातील रोमन 'क्रेट' नाण्यांवरील खुणांशी मिळतीजुळती आहे.
जागतिक व्यापाराचे केंद्र
पुरातत्वशास्त्रज्ञांच्या मते, हे केवळ धार्मिक प्रतीक नसून त्या काळातील प्रगत इंजिनिअरिंगचा नमुना आहे. प्राचीन काळी सोलापूर हे व्यापाराचे मोठे केंद्र होते. रोमन व्यापारी या चक्रव्यूहाचा वापर 'नेव्हिगेशनल मार्कर' (दिशादर्शक) म्हणून करत असावेत, असा अंदाज आहे. या काळात भारतातून मसाले, रेशीम आणि नीळ रोमला निर्यात केली जात असे, तर बदल्यात सोने आणि मौल्यवान रत्ने भारतात येत असत. बोरामणी परिसर या जागतिक व्यापार मार्गाचा एक महत्त्वाचा थांबा होता.
दरम्यान, हजारो वर्षांपूर्वी भारताचे व्यापारी संबंध किती विस्तारलेले होते, याचा हा शोध एक भक्कम पुरावा आहे. सोलापूरच्या या मातीने प्राचीन जागतिक व्यापाराचा इतिहास आपल्या पोटात जतन करून ठेवला आहे. ही रचना पाहण्यासाठी आता इतिहासप्रेमी आणि संशोधकांची उत्सुकता वाढली आहे.