Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. तरवाडे बुद्रुक गावातील 9 वर्षीय धनश्री उमेश शिंदे ही शाळेतून घरी परतताना अचानक बेपत्ता झाली होती. अखेर चार दिवसांच्या शोधानंतर गावालगतच्या शिवारातील एका विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. धनश्री ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीत शिक्षण घेत होती. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे ती शाळेसाठी घरातून निघाली होती. मात्र सायंकाळ झाली तरी ती घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. ग्रामपंचायत परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सायंकाळी सुमारे पावणे पाचच्या सुमारास धनश्री तेथून जात असल्याचे दिसून आले. त्यानंतर गावाबाहेरील शेत रस्त्यावर तिचे दप्तर सापडल्याने अपहरणाचा संशय अधिक गडद झाला होता.
आज सकाळी गावाशेजारील शिवारातील एका विहिरीत धनश्रीचा मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच जळगाव एलसीबीचे पथक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू असून, या प्रकरणी आधीच नोंद असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने मृत्यूचे कारण व घटना नेमकी कशी घडली याचा सखोल तपास सुरू आहे. तब्बल 60 ते 70 तास चाललेल्या शोध मोहिमेचा असा दुर्दैवी शेवट झाल्याने कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.
हेही वाचा – Chandrapur Crime News: सावकारी जिंकली, व्यवस्था हरली; कर्जाच्या ओझ्याखाली बळीराजाने किडनी विकली
नाल्यात पडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील भडगाव शहरात आणखी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. आदर्श कन्या विद्यालयाच्या इंग्लिश मीडियम नर्सरीत शिकणारे चार वर्षीय ज्ञानेश्वर मयंक वाघ आणि अंश सागर तहसीलदार या दोन लहानग्यांचा शाळेच्या आवारालगत असलेल्या नाल्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. आज सकाळी सुमारे 11 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. अलीकडील पावसामुळे नाल्यालगतची संरक्षण भिंत कोसळली होती. शाळेच्या परिसरात असलेल्या बाथरूमकडे जात असताना दोन्ही मुलांचा पाय घसरून ते थेट नाल्यात पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेनंतर तातडीने दोघांनाही भडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेनंतर शाळा परिसरात एकच आक्रोश झाला. पालकांनी शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त केला असून, योग्य सुरक्षा व्यवस्था असती तर ही दुर्घटना टाळता आली असती, असा आरोप करण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.