Rajasthan Royals Sale: इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL) जगात आतापर्यंतचा सर्वात मोठा धमाका झाला आहे. अमेरिकेतील दिग्गज उद्योजक काल सोमानी यांनी गुंतवणूकदारांच्या एका मोठ्या समूहासोबत मिळून 'राजस्थान रॉयल्स' या फ्रँचायझीची मालकी विक्रमी किमतीत विकत घेतली आहे. हा व्यवहार अंदाजे 1.63 अब्ज डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात सुमारे 15,300 कोटी रुपयांना निश्चित झाला आहे. या ऐतिहासिक घडामोडीमुळे जागतिक क्रीडा क्षेत्रात आयपीएलची ब्रँड व्हॅल्यू पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
गुजरात टायटन्सचा विक्रम मोडला; दुप्पट मूल्याने व्यवहार
हा व्यवहार आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात महागडा फ्रँचायझी व्यवहार ठरला आहे. यापूर्वी 'टॉरेंट ग्रुप'ने गुजरात टायटन्सचा 67 टक्के हिस्सा सुमारे 5,025 कोटी रुपयांना विकत घेतला होता, ज्यानुसार त्या संघाचे एकूण मूल्य 7,500 कोटी रुपये ठरले होते. मात्र, राजस्थान रॉयल्सचा हा व्यवहार त्या तुलनेत दुप्पटीहून अधिक मूल्याचा आहे. हा बदल आयपीएल 2026 चा हंगाम संपल्यानंतर अधिकृतपणे अंमलात येईल. सध्या या संघाचे मुख्य मालक मनोज बदाले असून त्यांच्याकडे 65 टक्के हिस्सा आहे, जो आता सोमानी यांच्या नेतृत्वाखालील समूहाकडे जाईल.
काल सोमानी: तंत्रज्ञान आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गज नाव
राजस्थान रॉयल्सची धुरा हाती घेणारे काल सोमानी हे अमेरिकेतील ॲरिझोना राज्यातील एक यशस्वी उद्योजक आहेत. त्यांना तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डेटा प्रायव्हसी क्षेत्रातील 15 वर्षांहून अधिक अनुभव आहे. विशेष म्हणजे, सोमानी यांना खेळांची प्रचंड आवड असून ते 'मोटर सिटी गोल्फ क्लब'चे सह-मालक आहेत. 2021 पासून ते राजस्थान रॉयल्सशी गुंतवणूकदार म्हणून जोडलेले होते, मात्र आता त्यांनी संपूर्ण संघाची सूत्रे हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. या समूहाला अमेरिकेतील प्रसिद्ध 'वॉल्टन' आणि 'हॅम्प' कुटुंबाचाही पाठिंबा आहे.
हेही वाचा – IPL 2026 New Rules: फलंदाजांची वाढणार धाकधूक; यंदा IPL मध्ये दुसऱ्या डावानंतर लागू होणार 'हा' नवा नियम
विजेत्या संघाची नवी झेप
आयपीएलच्या पहिल्याच हंगामाचे (2008) विजेतेपद पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सने 2022 मध्येही अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. सध्या या संघाचे कर्णधारपद रियान पराग भूषवत असून, श्रीलंकेचे दिग्गज कुमार संगकारा मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. नवीन मालकी हक्क मिळाल्यानंतर संघामध्ये आणि व्यवस्थापनात कोणते मोठे बदल होतात, याकडे आता क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.