Tamil Nadu Elections 2026: तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आता मोठी रंगत आली आहे. ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) या आपल्या राजकीय पक्षाच्या माध्यमातून राजकारणात एन्ट्री केलेले प्रसिद्ध अभिनेते आणि पक्षाचे अध्यक्ष विजय यांनी आज तिरुचिरापल्ली (त्रिची) पूर्व विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती, ज्यामुळे त्रिची परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
एकाच वेळी दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवणार?
अभिनेता विजय यांनी केवळ त्रिची पूर्वच नव्हे, तर दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 30 मार्च रोजी पेरांबूर विधानसभा मतदारसंघातूनही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे विजय हे या निवडणुकीत दोन महत्त्वाच्या मतदारसंघांतून नशीब आजमावणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. तमिळनाडूच्या राजकारणात आपला प्रभाव निर्माण करण्यासाठी त्यांनी दोन वेगवेगळ्या भौगोलिक क्षेत्रांची निवड केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
#WATCH | Tamil Nadu Elections 2026 | Tiruchirappalli: TVK president and actor Vijay filed his nomination to contest in Trichy East assembly constituency. He filed his nomination for Perambur on March 30. (Earlier visuals) pic.twitter.com/sJGuYdZ7Na — ANI (@ANI) April 2, 2026
टीव्हीके (TVK) पक्षाची प्रतिष्ठा पणाला
चित्रपटसृष्टीतील अफाट लोकप्रियतेनंतर विजय यांनी स्थापन केलेल्या TVK पक्षासाठी ही पहिलीच मोठी निवडणूक आहे. त्रिची पूर्व हा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा मानला जातो. या मतदारसंघातून स्वतः विजय रिंगणात उतरल्याने सत्ताधारी DMK आणि विरोधी पक्ष AIADMK समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. विजय यांच्या या निर्णयामुळे तमिळनाडूच्या 2026 च्या विधानसभा निवडणुकीत त्रिकोणी संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.