Siddhivinayak Temple Theft: मुंबईचे आराध्य दैवत आणि करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धिविनायक मंदिरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मंदिराच्या पवित्र आवारात सेवा करणाऱ्या एका कर्मचाऱ्यानेच दानपेटीतील रकमेवर डल्ला मारल्याचे समोर आले आहे. राजेंद्र पेंडुरकर (57) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो लोअर परळ येथील रहिवासी आहे. शुक्रवारी सीसीटीव्ही फुटेजची नियमित तपासणी सुरू असताना हा चोरीचा प्रकार उघड झाला. या घटनेमुळे मंदिर प्रशासनात आणि भाविकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून दादर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार मंदिर कर्मचारी सीसीटीव्ही तपासत असताना पेंडुरकर हा दानपेटीतून अत्यंत चलाखीने पैसे काढताना दिसून आला. संशय बळावल्याने ट्रस्टने मागील 8 ते 10 दिवसांचे फुटेज तपासले असता, हा आरोपी वारंवार अशा प्रकारे चोरी करत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपीने 10 हजार रुपये चोरल्याची कबुली दिली असली, तरी चोरीचा हा सिलसिला गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याने प्रत्यक्षात ही रक्कम मोठी असण्याची दाट शक्यता आहे. या गुन्ह्यात मंदिरातील इतर कोणाचे संगनमत आहे का, याचा शोध आता दादर पोलीस घेत आहेत.
सुरक्षेच्या गराड्यातच विश्वासघाताचा प्रकार
सिद्धिविनायक मंदिर हे अतिशय उच्च सुरक्षा असलेले ठिकाण मानले जाते. येथे दररोज हजारो सामान्य भाविकांसह राजकीय नेते, चित्रपट सृष्टीतील सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटू दर्शनासाठी येत असतात. अलीकडेच टी-20 विश्वचषक विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीही येथे येऊन बाप्पाचा आशीर्वाद घेतला होता. इतक्या कडक बंदोबस्तात बाहेरील व्यक्तीने चोरी करणे अशक्य असताना, खुद्द मंदिरातील जुन्या कर्मचाऱ्यानेच विश्वासाला तडा दिल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
हेही वाचा – Ashok Kharat: दररोज 39 लाख लिटर पाण्याचा गैरवापर? भोंदूबाबा खरातच्या संस्थानचा मोठा घोटाळा उघडकीस
पोलीस कोठडी आणि पुढील तपास
दादर पोलिसांनी आरोपी राजेंद्र पेंडुरकर विरुद्ध अधिकृत गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीची पार्श्वभूमी आणि चोरीचे गांभीर्य लक्षात घेता त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याने आतापर्यंत किती वेळा अशा प्रकारे दानपेटीतून पैसे काढले आणि यामागे काही संघटित टोळी आहे का, या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे. मंदिर ट्रस्टनेही या घटनेनंतर अंतर्गत सुरक्षा नियमावली अधिक कडक करण्याचे संकेत दिले आहेत.