Vijay Thalapathy Letter To PM Modi : तामिळनाडूचे नवनियुक्त मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय (विजय थलपती) यांनी राज्याची धुरा सांभाळताच थेट केंद्र सरकारकडे एक महत्त्वाचा विषय मांडला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक अधिकृत पत्र लिहून राज्यातील वस्त्रोद्योग आणि तयार कपड्यांचे (Garment Industry) क्षेत्र सध्या मोठ्या संकटात असल्याचे कळवले आहे. देशातील सर्वात मोठा वस्त्रोद्योग निर्यातदार असलेल्या तामिळनाडूमध्ये या क्षेत्रावर लाखो लोकांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार अवलंबून आहे. मात्र, कच्च्या मालाच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे या लाखो कामगारांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर बनला असून उद्योग वाचवण्यासाठी तात्काळ पावले उचलण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रात अधोरेखित केले आहे.
11 टक्के आयात शुल्क हटवण्याचे आवाहन
मुख्यमंत्री विजय यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात कापसावरील 11 टक्के आयात शुल्क (Cotton Import Duty) तात्काळ रद्द करण्याची आग्रही मागणी केली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत कापसाचे उत्पादन घटल्यामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, आता कच्च्या मालाचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केवळ आयात हाच एकमेव पर्याय उरला आहे. मात्र, सध्या अस्तित्वात असलेले 11 टक्के आयात शुल्क आयातीचा खर्च प्रचंड वाढवत असून तो वस्त्रोद्योग उत्पादकांसाठी पूर्णपणे तोट्याचा ठरत आहे. हे
शुल्क हटवल्यास उद्योगाला मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा – Fuel Price Increase: टाकी फुल करण्याआधी ही बातमी वाचा! पेट्रोल-डिझेल दरात मोठी वाढ, देशभरात महागाईची नवी लाट
दोन महिन्यांत किमतींमध्ये 25 टक्क्यांची मोठी वाढ
गेल्या अवघ्या 2 महिन्यांत कापूस आणि सुताच्या दरांमध्ये झालेली अभूतपूर्व दरवाढ हा या संकटाचा मुख्य गाभा आहे. मुख्यमंत्री विजय यांनी पत्रात दिलेल्या आकडेवारीनुसार, कापसाचे भाव 54,700 रुपयांवरून थेट 67,700 रुपये प्रति कँडीपर्यंत पोहोचले असून, ही सुमारे 25 टक्क्यांची मोठी वाढ आहे. याच कालावधीत सुताचे दरही 301 रुपये प्रति किलोवरून 330 रुपये प्रति किलो झाले आहेत. देशांतर्गत उत्पादनातील घसरणीसोबतच बाजारातील वाढत्या व्यापारी हालचालींमुळे कापूस आणि सूत उत्पादकांवर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे.
पंतप्रधानांकडून मुख्यमंत्री विजय यांचे अभिनंदन
अभिनेता ते राजकारणी असा प्रवास करत विजय तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे सोशल मीडियाद्वारे विशेष अभिनंदन केले होते. विजय यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देताना, तामिळनाडूतील जनतेचे जीवनमान सुधारण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारसोबत खांद्याला खांदा लावून काम करेल, अशी ग्वाही मोदींनी दिली होती. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री विजय यांनी घेतलेला हा पहिलाच मोठा पुढाकार आणि केंद्र-राज्य सहकार्याची केलेली मागणी तामिळनाडूच्या आर्थिक हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
हेही वाचा – DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खास भेट; महागाई भत्त्यातील वाढीसह महिल्यांच्या खात्यात येणार 'इतके' रुपये