Swiggy-Zomato Strike News: स्विगी-झोमॅटो सुरू की बंद? संभ्रम कायम; संपाच्या इशाऱ्यामुळे कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांवर इन्सेंटिव्हचा पाऊस, मात्र…

संपामुळे मुंबई, पुणे आणि दिल्लीसह प्रमुख शहरांमधील सेवा विसकळीत होण्याची भीती आहे. देशभरातील 1,00,000 हून अधिक डिलिव्हरी पार्टनर आज अ‍ॅपमध्ये 'लॉग इन' न करण्याची शक्यता आहे.

Swiggy-Zomato Strike News: स्विगी-झोमॅटो सुरू की बंद? संभ्रम कायम; संपाच्या इशाऱ्यामुळे कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांवर इन्सेंटिव्हचा पाऊस, मात्र…

Swiggy-Zomato Strike News : नव्या वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू असतानाच ऑनलाइन खाद्यपदार्थ आणि वस्तू मागवणाऱ्या ग्राहकांसमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. देशभरातील गिग वर्कर्सनी आपल्या विविध मागण्यांसाठी 31 डिसेंबर रोजी देशव्यापी संपाची हाक दिल्याने 'स्विगी-झोमॅटो सुरू राहणार की बंद?' असा संभ्रम निर्माण झाला आहे. एकीकडे डिलिव्हरी बॉईजनी रस्त्यावर न उतरण्याचा पवित्रा घेतला आहे, तर दुसरीकडे कंपन्यांनी त्यांना आमिष दाखवून कामावर खेचण्यासाठी इन्सेंटिव्हचा पाऊस पाडला आहे.

डिलिव्हरी बॉईजचा एल्गार आणि शहरांना बसणारा फटका
तेलंगणा गिग अँड प्लॅटफॉर्म वर्कर्स युनियन आणि इंडियन फेडरेशन ऑफ अ‍ॅप बेस्ड ट्रान्सपोर्ट वर्कर्सच्या नेतृत्वाखाली पुकारण्यात आलेल्या या संपामुळे मुंबई, पुणे आणि दिल्लीसह प्रमुख शहरांमधील सेवा विसकळीत होण्याची भीती आहे. देशभरातील 1,00,000 हून अधिक डिलिव्हरी पार्टनर आज अ‍ॅपमध्ये 'लॉग इन' न करण्याची शक्यता आहे. 10 मिनिटांच्या डिलिव्हरी मॉडेलमुळे होणारे अपघात, वेतनातील पारदर्शकता आणि आरोग्य विम्याचा अभाव या मुद्द्यांवरून कामगार आक्रमक झाले आहेत. 25 डिसेंबरच्या ख्रिसमस संपाचा अनुभव गाठीशी असल्याने युनियन्सनी रायडर्सना "एका दिवसाच्या लालसेला बळी न पडता" भविष्यातील सुरक्षिततेसाठी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

कंपन्यांकडून 'मेगा अर्निग'च्या ऑफर्स
संप मोडीत काढण्यासाठी आणि न्यू इयर इव्हचा नफा गमावू नये म्हणून स्विगी, झोमॅटो आणि झेप्टो या कंपन्यांनी 'बॅकफुट'वर येत इन्सेंटिव्हमध्ये मोठी वाढ केली आहे. झोमॅटोने संध्याकाळी 6 ते रात्री 12 या पीक आवर्समध्ये प्रति ऑर्डर 120 ते 150 रुपये देण्याची घोषणा केली असून, रायडर्सना एका दिवसात 3,000 रुपयांपर्यंत कमाईची संधी दिली आहे. तसेच, ऑर्डर रद्द झाल्यास लागणारी पेनल्टी (दंड) देखील तात्पुरती माफ करण्यात आली आहे. स्विगीने तर ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या दोन दिवसांत तब्बल 10,000 रुपयांपर्यंत 'मेगा कमाई'चे गाजर रायडर्ससमोर ठेवले आहे.

हेही वाचा – New Rules For Packaged Food : खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेसाठी आता फक्त दावे नाही, तर पुरावे द्या! 1 जानेवारीपासून FSSAI चे नियम बदलणार

संपाचे मुख्य कारण आणि कामगारांच्या मागण्या
केवळ तात्पुरते पैसे देऊन प्रश्न सुटणार नाही, असे युनियन्सचे म्हणणे आहे. डिलिव्हरी कामगारांच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत:

– 10 मिनिटांची डिलिव्हरी: जीवघेण्या ठरू शकणाऱ्या जलद डिलिव्हरीच्या पद्धतीला तीव्र विरोध.
– वेतन रचना: तात्पुरत्या इन्सेंटिव्हऐवजी कायमस्वरूपी आणि पारदर्शक वेतन निश्चिती.
– सुरक्षा कवच: अपघात विमा, आरोग्य विमा आणि पेन्शनसारख्या सामाजिक सुरक्षा लाभांची मागणी.
– कामाच्या अटी: ऊन, वारा, पाऊस अशा कठीण परिस्थितीत काम करताना सन्मानजनक वागणूक.

ग्राहकांची होणार अडचण?
ऑनलाइन फूड डिलिव्हरीसोबतच अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि झेप्टो यांसारख्या सेवांवरही या संपाचा सावट आहे. नवीन वर्षाच्या पार्टीसाठी हॉटेलमधून जेवण मागवणारे आणि पार्टीचे साहित्य ऑनलाइन ऑर्डर करणारे ग्राहक सध्या संभ्रमात आहेत. जर 1 लाख कामगारांनी ठरवल्याप्रमाणे अ‍ॅप बंद ठेवले, तर ऑर्डर बुक होऊनही वेळेवर न पोहोचणे किंवा सेवा पूर्णपणे ठप्प होणे असे प्रकार घडू शकतात. झेप्टोसारख्या क्विक कॉमर्स कंपन्यांनीही पेआउटमध्ये सुधारणा केली असली, तरी कामगार आपल्या भूमिकेवर किती ठाम राहतात यावरच सर्व गणिते अवलंबून आहेत.

कंपन्यांची दुहेरी कोंडी
सध्या डिलिव्हरी अ‍ॅप्स 'डबल फ्रंट'वर लढत आहेत. एकीकडे नवीन वर्षाच्या निमित्ताने वाढलेली अफाट मागणी पूर्ण करण्याचे आव्हान आहे, तर दुसरीकडे संपाचा प्रभाव कमी करण्यासाठी कामगारांना खूश ठेवण्याची कसरत करावी लागत आहे. ख्रिसमसच्या वेळी दिल्ली-NCR मध्ये सेवा विसकळीत झाल्याने कंपन्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते, त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ही 'इन्सेंटिव्ह'ची खेळी खेळली जात आहे. मात्र, ग्राहकांसाठी आजची संध्याकाळ 'वेटिंग'वर जाणार की 'डिलिव्हरी' होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

हेही वाचा – Union Budjet 2026: आरोग्य विमा ते एनपीएस; अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांच्या खिशाला दिलासा देणारे हे मोठे बदल अपेक्षित

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number