Supriya Sule: मुंबईत पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या (मविआ) महत्त्वपूर्ण बैठकीत आमदारांच्या अनुपस्थितीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान बुधवारी झालेल्या या बैठकीला एकूण 59 पैकी तब्बल 23 आमदारांनी पाठ फिरवली. एवढ्या मोठ्या संख्येने आमदार गैरहजर राहिल्यामुळे महाविकास आघाडीचे टेन्शन चांगलेच वाढले असून, राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. अनुपस्थित आमदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यासह अनेक बड्या नेत्यांचा समावेश आहे. मात्र, शरद पवार आणि जयंत पाटील हे वैयक्तिक कारणांमुळे या बैठकीला येऊ शकले नसल्याची माहिती समोर आली आहे.
16 आमदारांची नावे समोर; काँग्रेस आणि ठाकरेंचे आमदारही अनुपस्थित
या बैठकीला दांडी मारणाऱ्या 23 आमदारांपैकी 16 आमदारांची नावे समोर आली आहेत. यामध्ये सर्वाधिक काँग्रेसचे 6 आमदार गैरहजर होते, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रत्येकी 5 आमदार अनुपस्थित राहिले. मविआच्या सर्वच घटक पक्षांतील आमदारांनी या महत्त्वाच्या बैठकीकडे पाठ फिरवल्यामुळे आघाडीत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विरोधकांच्या या एकजुटीतील त्रुटींवरून आता राजकीय विश्लेषकांकडून विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
आमचे आमदार कुठे आहेत हे आम्हाला ठाऊक: सुप्रिया सुळे
या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आमदारांच्या अनुपस्थितीवर सारवासारव करताना त्या म्हणाल्या, “आमचे आमदार कुठे होते, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. जयंतराव पाटील हे सांगलीला होते, तर रोहित पवार काल पंढरपूरला होते. आमचे जे आमदार गैरहजर होते, ते आम्हाला पूर्वकल्पना देऊनच गेले होते.” तसेच सत्ताधारी भाजपवर निशाणा साधताना त्यांनी टोला लगावला की, अनेकदा संसदेत किंवा विधानभवनातही सत्ताधारी पक्षाचे लोक उपस्थित नसतात, त्यामुळे अशा गोष्टींना फार मोठे स्वरूप देण्याची गरज नाही.