Indigo Flight Cancellation : भारतातील आघाडीच्या विमान कंपन्यांपैकी एक असलेल्या इंडिगोने गेल्या दोन दिवसांत तब्बल एक हजार पेक्षा जास्त विमानांची उड्डाणे अचानक रद्द केली आहेत. यामुळे देशभरातील विमानसेवांवर (Air Services in India) मोठा परिणाम झाला असून, हजारो प्रवाशांना याचा थेट फटका बसला आहे. मुंबई, दिल्ली, हैदराबाद, बंगळूरु आणि अहमदाबाद सह अनेक महत्त्वाच्या विमानतळांवर (Passengers at Airports) अनेक प्रवासी अडकल्याचा दावाही केला जात आहे. या विसकळीत सेवेमुळे संतप्त झालेल्या प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांनी शुक्रवारी जाहीर माफी देखील मागितली आहे.
सुप्रिया सुळेंची थेट केंद्र सरकारकडे मागणी
इंडिगोची सेवा विस्कळीत होण्याची नेमकी काय कारणे आहेत, याची चौकशी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादीच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी केंद्र सरकारने (Central Government Action against Indigo) इंडिगोवर ॲक्शन घेण्याची मोठी मागणी केली आहे. त्या म्हणाल्या की, “ज्या पद्धतीने हजारो लोकांना गेल्या दोन दिवसांत अडचणी आल्या आहेत, त्याबद्दल केंद्र सरकारने इंडिगोवर कारवाई करायला हवी.”
संसदेत स्पष्टीकरण देण्याची मागणी
सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे या संपूर्ण घटनेवर स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे. “एवढ्या मोठ्या प्रमाणात विसकळीतपणा नेमका कसा झाला? आधी कोणतीही सूचना न देता हा विस्कळीतपणा सुरू आहे,” असा सवाल त्यांनी केला. यामुळे कोट्यवधी रुपये आणि वेळ वाया जात आहे. “आम्हाला इंडिगोकडून अशा प्रकारची अपेक्षा नव्हती,” असे त्या म्हणाल्या. तसेच, “केंद्र सरकारने इंडिगोसारख्या आणखी पाच कंपन्या तयार केल्या पाहिजेत, जेणेकरून स्पर्धा वाढेल,” अशी सूचनाही त्यांनी केली. यासंबंधीची सर्व माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे.
लाईव्ह |?चैत्यभूमी, दादर, मुंबई | पत्रकारांशी संवाद |?️06-12-2025
https://t.co/9ggmSgSNL4 — Supriya Sule (@supriya_sule) December 6, 2025
FDTL नियमांमुळे कर्मचाऱ्यांचा तुटवडा
इंडिगो एअरलाईन्सकडून दररोज सुमारे 2 हजार 200 विमानांचे उड्डाण केले जाते आणि भारताच्या हवाई वाहतुकीत या एअरलाईन्सचा 65 टक्के मोठा वाटा आहे. विमान वाहतूक नियामक संस्थेच्या (Regulator) आकडेवारीनुसार, नोव्हेंबर महिन्यात इंडिगोने 1 हजार 231 विमानांची उड्डाणे रद्द केली. यापैकी 755 विमाने कर्मचाऱ्यांची कमतरता (Staff Shortage) आणि नवीन फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (FDTL) नियमांमुळे रद्द झाली. उर्वरित विमाने एटीसीतील (ATC) समस्या आणि हवाई क्षेत्रातील निर्बंधांमुळे रद्द करण्यात आली.
वेळेवर लँडिंगच्या प्रमाणात मोठी घट
विमान वाहतूक नियामक संस्थेने जुलैपासून विमान कंपन्यांसाठी नवीन FDTL नियम लागू केले आहेत. त्यातच 1 नोव्हेंबरपासून रात्रीच्या लँडिंगवर मर्यादा घालून दिल्याने हे नियम अधिक कडक झाले आहेत. या नियमांमुळे वैमानिक आणि केबिन स्टाफ (Pilots and Cabin Staff) सह क्रू-सदस्यांना ड्युटीवर राहण्याच्या तासांवर कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. परिणामी विमान कंपन्यांना कर्मचाऱ्यांचा तुटवडा भासत असून त्यांच्यासमोरील आव्हाने वाढली आहेत. इंडिगोचा भारतीय हवाई वाहतुकीत मोठा हिस्सा असल्याने त्यांच्या विसकळीत झालेल्या सेवांचा इतर विमान कंपन्यांवरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. ऑक्टोबरमध्ये 84.1 टक्के विमानांचे वेळेत लँडिंग झाले होते, मात्र नोव्हेंबरमध्ये हा टक्का 67.7 पर्यंत खाली आल्याचे दिसून आले.