MPSC Online Exam Postponed: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा संगणकावर (CBT) घेण्याच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती मिळाली आहे. विद्यार्थी संघटनांनी केलेल्या जोरदार विरोधानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात तातडीने हस्तक्षेप केला. मुख्यमंत्र्यांनी एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार, मुख्य सचिव आणि सामान्य प्रशासन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत एक महत्त्वाची बैठक घेतली. परीक्षा घेताना गोपनीयता, पारदर्शकता आणि अचूकता राखणे आवश्यक आहेच, परंतु नवीन तंत्रज्ञान स्वीकारताना विद्यार्थ्यांना त्याशी जुळवून घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे ही नवीन ऑनलाइन प्रणाली तातडीने लागू न करता ऑगस्ट 2027 पासून टप्प्याटप्प्याने अमलात आणण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. तोपर्यंत पूर्वीप्रमाणेच ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा इशारा आणि मुख्यमंत्र्यांची सकारात्मक मध्यस्थी
एमपीएससीच्या परीक्षा जुन्याच पद्धतीने व्हाव्यात यासाठी राज्यभरातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या, तसेच आंदोलनाचा इशाराही दिला होता. या पार्श्वभूमीवर आमदार अभिमन्यू पवार यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सकारात्मक आश्वासनाची परिणती अखेर या निर्णयात झाली आहे. आता थेट ऑगस्ट 2027 पासूनच या ऑनलाइन पद्धतीची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
आमदार अभिमन्यू पवारांकडून आभार व्यक्त
राज्य सरकारच्या या महत्त्वपूर्ण निर्णयावर बोलताना आमदार अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. राज्यातील सुमारे 90 टक्क्यांपेक्षा जास्त परीक्षार्थींची ऑनलाइन परीक्षेऐवजी ऑफलाइन परीक्षेलाच पसंती होती, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या या संवेदनशील निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांना मोठा मानसिक दिलासा मिळाला असून, त्यांनी आता कोणतीही चिंता न करता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन पवारांनी केले. भविष्यात ऑनलाइन परीक्षांसाठी आवश्यक ती मजबूत पायाभूत यंत्रणा आधी उभारली जाईल आणि त्यानंतरच टप्प्याटप्प्याने ही पद्धत अमलात आणली जाईल, असेही बैठकीत निश्चित करण्यात आले आहे.