Indian Ships Stranded: जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी 'होर्मुझची सामुद्रधुनी' तांत्रिकदृष्ट्या खुली असली, तरी तेथील सुरक्षा व्यवस्था आणि वाढत्या धोक्यांमुळे भारतीय जहाजांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. मुंबईस्थित 'इंडियन नॅशनल शिपओनर्स असोसिएशन'चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल देवली यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या 14 भारतीय जहाजं या अरुंद जलमार्गात अडकून पडली आहेत. इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स'ने (IRGC) यापूर्वी भारतीय जहाजांवर केलेल्या हल्ल्यांमुळे खलाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
अनिश्चिततेचे वातावरण; व्यावसायिक वाहतूक ठप्प
अनिल देवली यांनी स्पष्ट केले की, जरी काही जहाजे या मार्गावरून जात असली, तरी व्यावसायिक वाहतुकीसाठीचा धोका 'हाय अलर्ट' पातळीवर आहे. काही तटस्थ देशांची जहाजे इराणच्या संमतीने किंवा अमेरिकेच्या संरक्षणाखाली प्रवास करत आहेत, मात्र सामान्य व्यावसायिक वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. सुरुवातीला काही भारतीय जहाजं सुखरूप बाहेर पडल्यामुळे खलाशांचा आत्मविश्वास वाढला होता, परंतु अलीकडील घटनांनी या विश्वासाला तडा गेला आहे.
भारतीय जहाजांवर गोळीबार; खलाशांचा आत्मविश्वास डगमळला
18 एप्रिल रोजी घडलेल्या एका गंभीर घटनेत, IRGC च्या बोटींनी भारतीय ध्वज लावलेल्या दोन जहाजांवर थेट गोळीबार केला. या घटनेनंतर खलाशांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली असून या प्रदेशातून प्रवास करणे आता अत्यंत धोकादायक बनले आहे. भारताने याप्रकरणी इराणच्या राजदूतांशी संपर्क साधून आपली तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या गोळीबारामुळे इराणच्या 'सुरक्षेच्या आश्वासनावर' असणारा भारतीय खलाशांचा विश्वास आता पूर्णपणे उडाला आहे.
इराणच्या सैन्याकडे सुरक्षिततेसाठी विनवण्या
रेडिओ संदेशांतून समोर आलेल्या माहितीनुसार, जहाजांचे कप्तान इराणच्या सैन्याकडे वारंवार विनवण्या करत आहेत. "तुम्हीच आम्हाला सुरक्षिततेची ग्वाही दिली होती," याची आठवण कप्तान रेडिओवरून करून देत आहेत. गेल्या महिन्यात शत्रुत्व शिगेला पोहोचले असताना जहाजांवरील अन्नपुरवठा आणि रसद विस्कळीत झाली होती. मात्र, आता परिस्थिती काहीशी सुधारत असून भारताने आतापर्यंत 8 LPG जहाजांच्या वाहतुकीसाठी आवश्यक मदत आणि समन्वय उपलब्ध करून दिला आहे. तरीही, अद्याप अडकलेल्या 14 जहाजांच्या सुरक्षिततेचा प्रश्न कायम आहे.