US Israel Iran War : हिंद महासागरात अमेरिकेने केलेल्या भीषण हल्ल्यानंतर बुडालेल्या इराणी युद्धनौकेतील खलाशांचे मृतदेह अखेर मायदेशी रवाना करण्यात आले आहेत. श्रीलंकेच्या गॅले किनाऱ्याजवळ 'आयआरआयएस डेना' (IRIS Dena) या युद्धनौकेवर झालेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 84 इराणी खलाशांचे पार्थिव श्रीलंकेने अधिकृतपणे इराणकडे सुपूर्द केले आहे. या घटनेमुळे इराणमध्ये संतापाची लाट असून त्यांनी या 'शहिदांच्या' हत्येचा सूड घेण्याची शपथ घेतली आहे.
गॅले किनाऱ्याजवळील तो भीषण टॉर्पेडो हल्ला
विशाखापट्टणम येथील नौदल सरावातून परतत असताना 4 मार्च 2026 रोजी अमेरिकेने 'आयआरआयएस डेना' या इराणी युद्धनौकेवर टॉर्पेडोने हल्ला केला होता. श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्यावरील गॅलेजवळ ही युद्धनौका बुडाली होती. या भीषण दुर्घटनेत 84 खलाशांचा जागीच मृत्यू झाला होता, तर 32 खलाशांना वाचवण्यात यश आले होते. वाचलेल्या खलाशांवर श्रीलंकेच्या करापिटिया राष्ट्रीय रुग्णालयात उपचार करण्यात आले आणि त्यांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला. 11 मार्च रोजी श्रीलंकेच्या मुख्य दंडाधिकाऱ्यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह इराणी दूतावासाकडे सोपवण्याचे आदेश दिले होते. श्रीलंकेच्या सरकारने सुरक्षा आणि तांत्रिक कारणास्तव परिस्थिती सामान्य होईपर्यंत हे मृतदेह ताब्यात ठेवले होते. शुक्रवारी एका खासगी तुर्की एअरलाइनच्या विमानाद्वारे हे सर्व 84 मृतदेह अत्यंत सन्मानाने इराणला पाठवण्यात आले.
इराणची 'सूड' घेण्याची भाषा
इराणचे जहाज कोणत्याही युद्धात सहभागी नसताना आणि शांततापूर्ण लष्करी सरावातून परतत असताना हा हल्ला झाल्याचा दावा इराणने केला आहे. या घटनेनंतर इराणी लष्कराचे कमांडर-इन-चीफ अमीर हतामी यांनी अमेरिकेला गंभीर इशारा दिला आहे. "आमच्या युद्धनौकेवरील हल्ल्याला इराण निश्चितच चोख प्रत्युत्तर देईल," असे त्यांनी जाहीर केले. श्रीलंकेने तटस्थ भूमिका घेत मानवतावादी दृष्टिकोनातून मृतदेह परत पाठवले असले तरी, इराणने या हल्ल्याचा सूड घेण्याची घोषणा केल्याने जागतिक महासत्तांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढते राजनैतिक पडसाद
युद्धनौका बुडवण्याच्या या घटनेमुळे अमेरिका आणि इराणमधील संबंधांनी आता टोक गाठले आहे. 'डेना' जहाज आणि त्यातील कर्मचाऱ्यांचे बलिदान इराणी नौदलाच्या इतिहासात अजरामर राहील, असे सांगतानाच त्यांनी सागरी सीमांच्या रक्षणासाठी नौदलाला अधिक शक्तिशाली बनवण्याचा निर्धार व्यक्त केला. या विधानामुळे येत्या काळात हिंद महासागर क्षेत्रात तणाव अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या हल्ल्यात श्रीलंकेचा कोणताही प्रत्यक्ष सहभाग नसला तरी, त्यांच्या हद्दीजवळ ही घटना घडल्याने श्रीलंकेची सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाली आहे.