Missing Link Overspeed Cameras: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवरील प्रवास जलद आणि सुलभ करणाऱ्या नव्याने तयार झालेल्या 'मिसिंग लिंक'वर आता वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार आहे. वाहनांच्या अनियंत्रित वेगामुळे वाढणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर, या मार्गातील चारही बोगद्यांमध्ये अत्याधुनिक ओव्हरस्पीड कॅमेरे बसवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
अपघाताच्या सत्रानंतर पोलीस आणि एमएसआरडीसी ॲक्शन मोडमध्ये
नवीन मार्गामुळे वेळेची मोठी बचत होत असली, तरी अनेक वाहनचालक वेगमर्यादेचे नियम धाब्यावर बसवून वाहने पळवत असल्याचे समोर आले आहे. नुकत्याच गुरुवारी मध्यरात्री वेगाच्या भरात झालेल्या भीषण अपघातात एका चालकाला आपला जीव गमवावा लागला. या घटनेची गंभीर दखल घेत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) आणि महामार्ग पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे दुर्घटना स्थळाची पाहणी केली. सुरक्षिततेचा उपाय म्हणून बोगद्यांच्या प्रवेशद्वारांवर तसेच आतल्या भागात तातडीने हाय-स्पीड कॅमेरे कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे वेगमर्यादा ओलांडणाऱ्या गाड्यांवर थेट डिजिटल पद्धतीने दंडात्मक कारवाई होईल.
बंदी असूनही घुसणाऱ्या अवजड वाहनांवर कडक कारवाई
'मिसिंग लिंक'वर सध्यातरी अवजड आणि व्यावसायिक वाहनांच्या वाहतुकीला पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही अनेक टेम्पो व ट्रकचालक नियम मोडून या मार्गावर प्रवेश करत आहेत. गुरुवारी रात्री झालेला अपघात एका अनधिकृतपणे प्रवेश केलेल्या आयशर टेम्पोला मागून धडक दिल्यानेच घडला होता. ही बेकायदेशीर घुसखोरी थांबवण्यासाठी पोलिसांनी आता रणनिती बदलली आहे.
हेही वाचा – Cyber Crime: ना OTP ना बँक डिटेल्स… WhatsApp वर फक्त एक फाईल ओपन केली अन् खात्यातून गायब झाले पावणेतीन लाख
दोन किलोमीटर आधीच लावणार नाकाबंदी
बोगद्यात प्रवेश करण्याच्या तब्बल दोन किलोमीटर आधीपासूनच विशेष पथके तैनात केली जाणार आहेत, जेणेकरून कोणत्याही अवजड वाहनाला या मार्गावर प्रवेश करता येणार नाही. महामार्ग पोलिसांच्या माहितीनुसार, आतापर्यंत नियम तोडणाऱ्या 650 हून अधिक अवजड वाहनांवर कारवाई करून मोठा दंड वसूल करण्यात आला आहे. येत्या दिवसांत ही मोहीम आणखी तीव्र केली जाईल. वेगाचा थरार जीवावर बेतणारा ठरू नये, यासाठी प्रशासनाने चालकांना शिस्त पाळण्याचे व वेगमर्यादेचे पालन करण्याचे कडक आवाहन केले आहे.