Mamta Kulkarni: एकेकाळी बॉलिवूडची ‘ग्लॅमर गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी ममता कुलकर्णी पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. 2025 च्या महाकुंभादरम्यान ममताने सर्वांना अवाक करत संन्यासाचा मार्ग स्वीकारला होता. तिला ‘किन्नर आखाड्याची’ महामंडलेश्वर म्हणूनही घोषित करण्यात आले होते, मात्र तीव्र विरोधानंतर तिला त्या पदावरून मुक्त करण्यात आले. त्यानंतर बराच काळ भगव्या वस्त्रांत ‘साध्वी’ म्हणून वावरणाऱ्या ममताने अवघ्या एका वर्षातच आपला बाणा बदलला आहे. तिने संन्यासी जीवन सोडून पुन्हा एकदा आधुनिक आणि ग्लॅमरस जीवनशैली स्वीकारल्याचे पाहायला मिळत आहे.
विमानतळावरील ‘वेस्टर्न लूक’ आणि 50 हजारांचे स्मार्ट सनग्लासेस
ममता कुलकर्णीने अलीकडेच तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला असून, त्यात तिचा साध्वी अवतार कोठेही दिसून येत नाही. गोव्याला सहलीसाठी निघालेल्या ममताने लाल रंगाचा शॉर्ट ड्रेस, मोकळे केस आणि ग्लॅमरस लूक धारण केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने आपल्या 50 हजार रुपये किमतीच्या ‘मेटा एआय’ (Meta AI) सनग्लासेसचे खास प्रदर्शन केले आहे. आपल्या कुटुंबासह आणि मित्रांसह एका खाजगी वाढदिवसाच्या पार्टीसाठी ती गोव्याला रवाना झाली असून, तिच्या या बदललेल्या अवतारामुळे चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सोशल मीडियावरील ट्रोलिंग
ममताचा हा बदल पाहून सोशल मीडिया वापरकर्त्यांनी तिला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. एका युजरने उपरोधाने विचारले, “साध्वी बनण्याचे भूत अखेर डोक्यातून उतरले वाटते?” तर दुसऱ्या एकाने टिप्पणी केली की, जेव्हा काम मिळणे कठीण होते, तेव्हा कलाकार खऱ्या आयुष्यातच विविध भूमिका साकारतात. ती अजूनही स्वतःला ‘साध्वी’ मानते की तिने ग्लॅमरच्या दुनियेत पुनरागमन करण्यासाठी संन्यासाचा त्याग केला आहे, याबाबत तिच्या चाहत्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
हेही वाचा – Dhurandhar 2 OTT Release : ठरलं! या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसणार ‘धुरंधर 2’, झालंय सर्वांत महागडं डील
25 वर्षांनंतर टीव्हीवर पुनरागमन; ‘लाफ्टर शेफ्स’मध्ये हजेरी
वैयक्तिक आयुष्यातील अनेक वादळांनंतर, ममता कुलकर्णीने तब्बल 25 वर्षांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. भारती सिंगच्या ‘लाफ्टर शेफ्स’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये ती पाहुणी म्हणून सहभागी झाली होती. यावेळी तिने केशरी रंगाची साडी परिधान केली होती आणि सहकलाकारांसोबत नृत्याचा आनंदही लुटला. करण अर्जुन, बाजी आणि सबसे बडा खिलाडी यांसारख्या सुपरहिट चित्रपटांची नायिका राहिलेली ममता आता बॉलिवूडमध्ये पुन्हा सक्रिय होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.