विजय चिडे, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील कडेठाण परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्वतःच्या वडिलांना संपवून त्यांचा मृतदेह घरातच पुरल्याची माहिती समोर येताच संपूर्ण गावात खळबळ उडाली. कल्याण बापूराव काळे (वय 60) असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्यांचा मुलगा रामेश्वर कल्याण काळे हा या प्रकरणातील आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने तब्बल आठ दिवसांपूर्वी वडिलांना संपवून घराच्या आतच त्यांच्या मृतदेहाला खड्डा खणून पुरून टाकले. सुरुवातीला हा प्रकार कुणाच्या लक्षात आला नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांना संशय आला. परिसरातील रहिवाशांनी तत्काळ पाचोड पोलीस ठाण्याशी संपर्क साधत याबाबत माहिती दिली.
हेही वाचा – Crime News : तिच्या हट्टापायी गेला मुलांचाही जीव; नवऱ्यानं पत्नीसह स्वतःच्याचं दोन्ही मुलांना संपवलं
काय आहे नेमकं प्रकरण?
कल्याण बाबुराव काळे हे पत्नी सुमनबाई (वय 62) आणि मोठा मुलगा रामेश्वर काळे (वय 28) यांच्यासोबत कडेठाण येथील गायरान जमिनीवरील जुन्या माळवदाच्या घरात राहत होते. धाकटा मुलगा लक्ष्मण काळे (वय 22) हा ऊसतोडीच्या कामासाठी बाहेर गावी होता. घरची परिस्थिती बिकट असून पितापुत्रांमध्ये मद्यपानाच्या सवयीमुळे नेहमी वाद होत असत. आठ दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून कल्याण आणि रामेश्वर यांच्यात पुन्हा भांडण झाले. संतापाच्या भरात रामेश्वरने वडिलांना गळा आवळून संपवलं. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याने मृतदेह घरातील माळवदाच्या खोलीत पुरून टाकला. ही घटना आई सुमनबाईने डोळ्यांनी पाहिली होती. मात्र रामेश्वरने तिला धमकी दिल्यामुळे ती येणाऱ्या-जाणाऱ्यांना काही बोलली नाही.
दुर्गंधीने उघड झाला खून
कल्याण काळे आठ दिवसांपासून घराबाहेर दिसत नसल्याने गावात थोडी चर्चा होती. मात्र कुणी गांभीर्याने चौकशी केली नाही. शनिवारी मात्र घरातून येणाऱ्या तीव्र दुर्गंधीने सुमनबाईंना सहन न झाल्याने त्यांनी ही माहिती आपल्या दिराला दिली. त्याने त्वरित पाचोड पोलिसांना कळवले. दरम्यान, याबाबत माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित, पोलीस उपनिरीक्षक राम बारहाते यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. घराची तपासणी करताना पोलिसांना मृतदेह सापडला. त्यानंतर हा थरारक प्रकार उघड झाला. पोलिसांनी लगेचच आरोपी रामेश्वर काळे याला ताब्यात घेत अटक केली.
हेही वाचा – Delhi Blast Update: दिल्ली स्फोट प्रकरणात इरफान मुख्य सूत्रधार; ब्रेनवॉश करायचा आणि…
या घटनेमुळे कडेठाण गावात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाचोड पोलिसांकडून या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू असून, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.